

निर्णय राऊत
आंबोली : सिंधुदुर्गात अखेर थंडीची चाहूल लागली आहे. दिवसा उन्हासोबत गारवायुक्त तरोताजा करणाऱ्या वाऱ्यासह रात्रीच्या वेळी उत्साहीत करणाऱ्या थंडीची सुखद अशी अनुभूतीच मिळत आहे. दिवसा ३० अं. से. तापमान तर रात्री १८ तेे २० अं. से. तापमान हे सिंधुदुर्गात असून दिवाळीपूर्वीच थंडीचे आगमन झाल्याने उन्हाच्या कडक्यातून मात्र सर्वांनाच दिलासाच मिळालेला आहे. येत्या काही दिवसांत थंडीचा जोर हळूहळू आणखी वाढणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनाही तळकोकणातील नैसर्गिक थंडी अनुभवता येईल.
गेले तीन ते चार दिवसांपासून तळकोकणात थंडीला सुरुवात झालेली आहे. थंडीचा जोर सर्वत्र अजून वाढला असता मात्र, नुकत्याच झालेल्या अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे थंडीत काहीशी घट झाली होती. असे असले तरी येत्या आठवड्याभरात तळकोकणासह सर्वत्र थंडीचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे ही दिवाळी गुलाबी थंडीत यादगार ठरेल! यात शंका नाही. अलनिनो च्या प्रभावामुळे यंदाच्या मॉनसून वर मोठा परिणाम झाला असून सततचे बदलते वातावरण, यामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यात थंडीची तीव्रता वाढणार असून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गात सद्या पहाटेच्या वेळी ठिक ठिकाणी थंडीची सफेद चादर पसरल्या सारखे मोहक दृष्य नजरेस पडते. परिणामी जिल्ह्यात दिवसा ३० अं. से. तापमान तर रात्रीच्या वेळी १८/२० अं. से. पर्यंतचा घट झालेल्या तापमानाचा पारा असतो.
आंबोलीत प्रचंड थंडी
आंबोलीतही सध्या प्रचंड थंडी तथा दवबिंदूयुक्त गार वाऱ्याला सुरुवात झाली आहे. पहाटे सर्वत्र धुक्याची सफेद चादर तसेच घाट परिसरातील हिरव्यागार दऱ्यांमध्ये ठिकठिकाणी उतरलेले पांढरेशुभ्र मेघ, असे चित्र आहे. अशा नयनरम्य दृष्यांमुळे घाटमार्गातून प्रवास करणारे असंख्य प्रवासी आणि पर्यटकांतही उत्साहाचे वातावरण असून सूर्योदय तसेच सूर्यास्ताच्या वेळी थंडीचा आणि डोंगर दऱ्यामध्ये पसरलेल्या धुक्याचाही ते मनसोक्त आनंद घेत आहेत. हिवाळ्यात आंबोलीत नेहमीच कडाक्याची थंडी असते. त्यामुळे थंडीच्या काळात आंबोलीत रात्रीच्या वेळी सुमारे ७ अं. से.पर्यंत खाली तापमान येते. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांना ही रात्रीच्यावेळी शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे .