

वैभववाडी : करूळ घाटातून 24 फेब्रुवारीपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. हलक्या वाहनासह, ट्रक, खासगी आराम बस सारखी वाहने घाटातून जाऊ लागली आहेत. मात्र अद्याप एसटी महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे घाट सुरू होऊनही सर्वसामान्य प्रवाशांना त्रास कायम आहे.
गेल्या वर्षी 22 जानेवारी 2024 पासून करूळ घाटाच्या नूतनीकरणासाठी घाट मार्गातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. जवळपास सव्वा वर्षानंतर 24 फेब्रुवारीपासून करूळ घाटातून वैभववाडी-कोल्हापूरमार्गे एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिले आहेत. त्यानुसार घाटातून हलकी व ट्रक, खाजगी आराम बस सारखी वाहने जाऊ लागली आहेत. घाटातून वाहतूक सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र घाटातील एकेरी वाहतूक सुरू होऊन आठ दिवस झाले तरी अद्यापही एसटी वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा कोणताही फायदा झालेला नाही.
करूळ घाट बंद असल्यामुळे गेली सव्वा वर्ष या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंडाबरोबरच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. करूळ घाटाला पर्यायी घाट मार्ग म्हणून ओळखल्या जाणार्या भुईबावडा घाटातूनही गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सुरक्षितेच्या कारणामुळे फक्त सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच एसटी वाहतूक सुरू आहे. रात्रीच्या वेळी पूर्णपणे भुईबावडा घाटातून एसटी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना फोंडाघाट अथवा अनुस्कुरा घाटाचा पर्याय किंवा खासगी वाहनाचा आधार दामदुपट्ट भाडे देऊन नाईलाजाने स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे करूळ घाटातून एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तर वाहतूक नियंत्रक वैभववाडी यांच्याशी संपर्क साधला असता, एसटी वाहतूक सुरू करण्याबाबत अद्याप आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात आले नसल्याचे सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी काढलेले आदेश एसटी महामंडळापर्यंत पोहचायला अजून किती दिवस लागणार आहेत आणि बस सेवा कधी सुरू होणार, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवनिवार यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत. हा आदेश सर्वांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.