कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरणासाठी केंद्रावर दबाव टाकू : विनायक राऊत

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरणासाठी केंद्रावर दबाव टाकू : विनायक राऊत

सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसप्रकरणी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जागरूक आहे. या प्रश्नाचे आपणास जाणीव आहे. त्यामुळे सातत्याने या प्रश्नावर मी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. आता राज्य सरकारवर दबाव टाकून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. जोपर्यंत राज्य शासन केंद्र सरकारकडे कोकण रेल्वे भारतीय रेल्वे मध्ये विलीन करून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. राज्याकडून हा प्रस्ताव केंद्रात गेल्यास तो मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारवर आम्ही दबाव टाकू, असे आश्वासन ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

राऊत म्हणाले की, बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव सिंधुदुर्ग विमानतळासाठी द्यावे, अशी मागणी केली. तशीच प्रा. मधू दंडवते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची मागणी आपण केंद्राकडे केली आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा लागेल. यासाठी राज्य सरकारवर दबाव टाका, आपण तुमच्या सोबत आहोत.

अॅड संदीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट, नंदू तारी, तेजस पोयेकर यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आदी उपस्थित होते.

logo
Pudhari News
pudhari.news