

बांदा : शेर्ले-सिद्धार्थनगर येथील शंकर रामा जाधव यांच्या घराची दगडी भिंत सोमवारी पहाटे कोसळली. दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या पत्नी आणि मुलगी बचावली. मात्र भिंतीचे दगड पत्नी व मुलीच्या पायावर कोसळल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. या घटनेत जाधव कुटुंबीयांचे सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झालेे. श्री. जाधव यांनी शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
सोमवारी शंकर जाधव हे कुटुंबासह घरात झोपले असताना पहाटे अचानक त्यांच्या घराची मातीची भिंत दगडी भिंतीवर पडली व त्यामुळे दगडी भिंतही कोसळली. भिंतीचे दगड त्यांच्या पत्नीच्या आणि मुलीच्या पायावर पडले. त्यामुळे दोघीही किरकोळ जखमी झाल्या.
या दुर्घटनेत घरातील अनेक वस्तूंचे मिळून सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शंकर जाधव यांनी केली आहे.