

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी युवा नेते विशाल परब यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी दिली. परब यांच्या घरवापसीनंतर ते बोलत होते.
मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात हा घर वापसीचा कार्यक्रम झाला. परिसर भाजपच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. विशाल परब यांच्यासोबत अनेक युवा आणि महिला कार्यकर्तेही भाजपमध्ये परतले. या कार्यक्रमाला भाजपचे आ. विक्रम पाचपुते, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रभाकर परब यांच्यासह अॅड. अनिल निरवडेकर, अमित परब, केतन आजगावकर, श्री. आरोदेंकर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. युवा नेते विशाल परब यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे जाहीर केला. या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्याचे स्वागत केले.
हा निर्णय पक्षातील एकजूट अधिक बळकट करणारा मानला जात आहे. विशाल परब यांच्या निलंबनामुळे काही काळ सिंधुदुर्गातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, मात्र आता त्यांचे निलंबन मागे घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. उद्योजक असलेले विशाल परब हे मुळात भाजपवर प्रेम करणारे नेतृत्व आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. अपक्ष उमेदवार असूनही त्यांनी सुमारे34 हजार मते मिळवली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला. महाविकास आघाडीने अनेकदा दिलेली आमंत्रणे त्यांनी धुडकावून लावली होती.
भाजपचे युवा नेते विशाल परब हे घरातच होते, त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला ‘घरवापसी’ म्हणता येणार नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. परब यांच्यावरील निलंबन मागे घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आ.चव्हाण म्हणाले, विशाल परब एक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांची आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांची नाळ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपशी जोडलेली आहे. त्यामुळे ते घरातच होते, असे म्हणता येईल. त्यांनी विशाल परब यांच्या जुन्या कामाचे कौतुक केले आणि भविष्यातही त्यांनी त्याच पद्धतीने पक्ष व संघटना वाढवण्यासाठी जोमाने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आम्ही त्यांच्या कायम पाठीशी आहोत, असे सांगत त्यांनी परब आणि त्यांच्यासोबत पक्षात परतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
आ. रवींद्र चव्हाण म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे सावंतवाडीची जागा शिवसेनेला (शिंदे गट) सुटली होती. त्यामुळे भाजपसह महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दीपक केसरकर यांना पाठिंबा दिला. त्यावेळी विशाल परब यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र निलंबनानंतरही विशाल परब यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा वारंवार व्यक्त केली होती. त्यांच्या या विनंतीचा विचार करून त्यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे आ. चव्हाण यांनी सांगितले.
जगात नंबर एकचा पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. मी भाजपचा एक छोटा कार्यकर्ता आहे. मी घरातच होतो, परंतु परिस्थितीनुसार काही काळ बाहेर राहिलो. येणार्या काळामध्ये योग्य दिशेने काम करताना जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला आरोग्याचा प्रश्न सोडवणार असल्याचे विशाल परब यांनी सांगितले. आपल्यावर पक्ष देईल ती जबाबदारी घेऊन भाजपची ध्येय धोरणे नुसार काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक क्षण पक्षाच्या कामासाठी देणार असल्याचे त्यांनी घर वापसी नंतर बोलताना सांगितले.