

बांदा : तांबोळी येथे आपल्या मूळ गावी गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने सुमारे 12 लाखांच्या दागिन्यासह 19 हजारांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना विलवडे टेंबवाडी येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. बांदा-दाणोली जिल्हा मार्ग लगत मंगळवारी दुपारी भरवस्तीत दिवसा घडलेल्या या घटनेमुळे विलवडे गावात खळबळ उडाली आहे.
विलवडे -टेंबवाडी येथे विलास गणपत सावंत आणि सुभाष गणपत सावंत यांचे एकत्रित घर आहे. विलास सावंत कुटुंबासह बाहेर वास्तव्यास असतात तर सुभाष सावंत आणि त्यांचे कुटुंबीय या घरात राहतात. त्यांचे मूळ गाव तांबोळी येथे असून त्या ठिकाणी गणपतीच्या तयारीसाठी सुभाष सावंत आणि त्यांच्या पत्नी सकाळी 10 च्या सुमारास तांबोळी येथे गेल्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने दुपारच्या सुमारास टिकावाने मुख्य दरवाजाचे कुलूप फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील दोन्ही कपाटे फोडून यातील सोन्याचा हार, मंगळसूत्र, कानातील कुडी तसेच इतर दागिने आणि 19 हजाराची रोकड लंपास केली.
सायंकाळी 4 वा. च्या सुमारात सुभाष सावंत घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा असलेला पाहून धक्का बसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील दोन्ही कपाटे फोडून दागिने लंपास केल्याचे समजले. या घटनेची माहिती त्यांनी शेजार्यांना देताच सरपंच प्रकाश दळवी, तंटामक्त गाव समिती अध्यक्ष कृष्णा सावंत, पोलिस पाटील दीपक नाईक आदींसह ग्रामस्थांनी धाव घेतली. या घटनेची माहिती बांदा पोलिस स्थानकात देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे तसेच पाठोपाठ श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास सुरू होता.