Sindhudurg News : विजयदुर्ग येथे रत्नागिरीतील अवैध पर्ससीन नौका जप्त

देवगड सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाची कारवाई
Sindhudurg News
विजयदुर्ग येथे रत्नागिरीतील अवैध पर्ससीन नौका जप्त
Published on: 
Updated on: 

देवगड : महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमाचे उल्लंघन करून अवैध पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. विजयदुर्ग जेटीसमोर सुमारे तीन वाव पाण्यात अवैध पर्ससीन मासेमारी करताना रत्नागिरी येथील नौका मालक अर्शद अ. लतीफ पावसकर यांच्या ‘SAAD MAAZ’ या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत ती जप्त केली.

सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ही कारवाई केली. नौकेची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण २० परप्रांतीय खलाशी आढळून आले. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम, १९८१ मधील तरतुदींचे उल्लंघन करून अवैध पद्धतीने मासेमारी केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. कारवाईनंतर संबंधित नौका ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणण्यात आली असून, अधिनियमातील तरतुदींनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, गेल्या चार दिवसांत पर्ससीन नौकेवर करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत बोलताना परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी सांगितले, परवान्यात निर्दिष्ट केलेल्या क्षेत्राबाहेर कोणीही मासेमारी केल्यास कडक कारवाई केली जाईल. कायद्याचे उल्लंघन सहन केले जाणार नाही.

दरम्यान, या कारवाईचे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी स्वागत केले आहे. १२ समुद्री मैलांच्या आत आवश्यक परवानगीशिवाय होणाऱ्या पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारी तसेच सागरी जैवविविधतेवर परिणाम होत असल्याची तक्रार मच्छीमारांकडून दीर्घकाळापासून केली जात होती. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाने नियमित पाळत ठेवून अवैध मासेमारीविरोधात कठोर अंमलबजावणी सुरू केल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news