

वेंगुर्ला : पोलिस प्रशासनामार्फत बुधवार सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टी भागात गुरुवारी सायंकाळ पर्यंत सागर कवच सुरक्षा-2 राबवण्यात आले. या अभियानात वेंगुर्ला पोलिस ठाण्यामार्फत उत्तम कामगिरी बजाविताना वेंगुर्ला पोलिस ठाण्याचे सागर कवच सुरक्षा अभेद्य असल्याचे सिद्ध केले.
बुधवारी सकाळी सागर कवच अभियान 2 सुरू होताच अवघ्या चार तासातच रेड टीम ताब्यात घेत वेंगुर्ला पोलिस ठाण्याने उत्तम कामगिरी बजाविली. बुधवारी सकाळी 6 वा. पासून सुरू झालेल्या या सागर कवच अभियानात जिल्ह्यातील सर्व सागरी किनार्यावर सुरक्षा कवच लावण्यात आली होती.
त्यानुसार बुधवारी सकाळी 10 वा. च्या सुमारास वेंगुर्ला पोलिस ठाणे हद्दीतील उभादांडा- वरचेमाड समुद्रात एक संशयित बोट दिसून आल्याने पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी व पथक यांनी पेट्रोलिंग दरम्यान तात्काळ समुद्रकिनार्यावर जाऊन संशयित बोटीची व त्यावर असलेल्या व्यक्तींची चौकशी केली असता सदर े बोटीमध्ये रेड टीम मधील सदस्य असल्याची खात्री झाली. त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली. यावरूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी सुरक्षा अभेद्य असल्याचे दिसून दिसून आले.