

Vareri murder incident
देवगड : सिगारेट पेटवण्यासाठी लायटर देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका परप्रांतीय तरुणाने आपल्याच चुलतभावाच्या डोक्यात टॉमीसारखे अवजड हत्यार घालून त्याचा निर्घृण खून केला. देवगड तालुक्यातील वरेरी-कुळये सडेवाडी येथील एका चिरेखाणीवर मंगळवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
कृष्णकुमार जुगराज यादव (वय 20, मूळ रा. मध्य प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलतभाऊ, संशयित आरोपी रितीक दिनेश यादव (वय 20) याला देवगड पोलिसांनी अटक केली आहे.
वरेरी येथील एका चिरेखाणीवर कृष्णकुमार आणि रितीक हे दोघे चुलतभाऊ कामाला होते. मंगळवारी रात्री काम संपल्यानंतर दोघेही खाणीवरील एका ट्रकमध्ये झोपण्यासाठी गेले. यावेळी रितीकने सिगारेट पेटवण्यासाठी कृष्णकुमारकडे लायटर मागितला. मात्र, त्याने लायटर देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात कृष्णकुमारने रितीकच्या कानशिलात लगावली.
हा अपमान रितीकच्या जिव्हारी लागला. त्याने मनात राग धरून ट्रकमधील टॉमी घेतली आणि बाहेर गेलेल्या कृष्णकुमारचा पाठलाग केला. संधी साधून त्याने पाठीमागून कृष्णकुमारच्या डोक्यात टॉमीने जोरदार प्रहार केला. हा घाव वर्मी लागल्याने कृष्णकुमार रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रितीकने टॉमी जवळच्या पाण्यात फेकून देत घटनास्थळावरून पळ काढला.
बुधवारी सकाळी मुकादम विजय शेंडगे खाणीवर आले असता त्यांना कृष्णकुमार मृतावस्थेत आढळला, तर रितीक गायब होता. त्यांनी तातडीने शोध घेतला असता रितीक तळेबाजार येथे आढळून आला. शेंडगे यांनी त्याला विश्वासात घेऊन पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयित रितीकला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेने देवगड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह कणकवलीचे पोलिस उपअधीक्षक घनश्याम आढाव यांनीही घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. या घटनेत अन्य कुणाचा सहभाग आहे का या दृष्टिनेही तपास करावा, अशा सूचना अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी पोलिसांना दिल्या. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे पोलिसांनी हस्तगत केल्या.
दरम्यान, संशयित रितीक याने आपण रागाच्या भरात कृष्णकुमारचा खुन केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिस निरिक्षक भरत धुमाळ यांनी सांगितले. घटनास्थळी उपनिरिक्षक महेश देसाई, हवालदार महेंद्र महाडिक, आशिष कदम, भाऊ नाटेकर, पो.कॉ.प्रसाद आचरेकर, दीपेश तांबे, रवींद्र महाले, राजेश पाटील यांनी काम पाहिले. वरेरी सरपंच सप्रिया गोलतकर, पोलिस पाटील मुकेश पारकर, चिरेखाण मालक उमेश गवाणकर उपस्थित होते.