

वैभववाडी ः मारुती कांबळे
वैभववाडी तालुक्यातील सहा पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक उमेदवारांची पक्ष नेतृत्वाकडे आपणच कसे सक्षम उमेदवार आहोत हे पटवून देण्याचा आटापिटा सुरू आहे.
वैभववाडी तालुक्यात सद्यस्थितीत भाजप हा सर्वात मोठा व मजबूत पक्ष असून त्याचा सामना करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आपले आपले अस्तित्व पणाला लावावे लागणार आहे. यात त्यांचे मित्र पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व मनसे त्यांना कशी साथ देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
भुईबावडा गण मतदारसंघात जांभवडे नेर्ले, तिरवडे तर्फ सौदंळ,उपळे, मौदे आखवणे, भोम, हेत, भुईबावडा, ऐनारी, तिरवडे तर्फ खापरेपाटण या गावांचा समावेश आहे. या मतदारसंघातून सन 2017 साली काँग्रेस मधून दुर्वा खानविलकर या विजयी झाल्या होत्या. तर सन 2012 साली काँग्रेस मधून मंगेश गुरव हे विजयी झाले होते. हा मतदार संघ खुला असल्यामुळे या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत भाजपकडून माजी सरपंच देवानंद पालांडे हे तर माजी सरपंच किशोर कांबळे, स्वप्नील खानविलकर, पप्पू इंदुलकर, डॉ. कामतेकर, इच्छुक असल्याचे समजते तर शिवसेना उबाठा सेनेकडून वसंत मोरे, बाबा मोरे इच्छुक असल्याची माहिती आहे.
कोळपे गण हा सर्वसाधारण महिला राखीव आहे.या मतदारसंघात कोळपे, तिथवली, नानिवडे, वेंगसर, मांगवली, आखवणे, भोम पुनर्वसन गावठाण या गावांचा समावेश आहे. या मतदारसंघातून सन 2017 साली काँग्रेसच्या हर्षदा हरयाण तर 2012 साली नासीर काझी विजयी झाले होते. सध्या या मतदारसंघातून भाजपाकडून स्वरा खाडे, आखवणे-भोम माजी सरपंच आर्या कांबळे यांनी पक्षाकडे उमदेवावारी मागितली आहे. या मतदारसंघातील प्रमुख दावेदार, पं.स. माजी सदस्या सीमा नानिवडेकर यांनी अद्याप आपले पत्ते खोलेले नाहीत. तर उबाठा सेनेकडून रहीना काझी इच्छुक आहेत.उंबर्डे गण हा सुद्धा सर्वसाधारण महिला राखीव असून या मतदार संघात उंबर्डे, कुसूर, कुंभवडे, करूळ, या गावांचा समावेश आहे. या मतदारसंघातून सन 2017 साली काँग्रेसकडून अरविंद रावराणे हे विजयी झाले होते तर 2012 शोभा पांचाळ विजयी झाल्या होत्या. या मतदारसंघातून भाजपकडून नमिता दळवी, साची कोलते, जानव्ही पाटील, पूर्वा पाटील, श्रेया सावंत या इच्छुक आहेत. करूळ गावातून तब्बल चार उमेदवार इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे मागणी केली आहे. तर उबाठा सेनेकडून स्मिता पाटील इच्छुक असल्याचे समजते.
कोकिसरे गण ओबीसी महिला राखीव असून या मतदार संघात कोकिसरे, नापणे, नाधवडे हे गावी येतात. या मतदारसंघातून सन 2017 साली भाजपाच्या अक्षता डाफळे, सन 2012 काँग्रेसचे बंडया मांजरेकर विजयी झाले होते. भाजपकडून माजी सभापती अक्षता डाफाळे, सुचिता नकाशे, प्राची मुंडले समीक्षा पाटणकर यांनी उमेदवारी मागितले आहे तर शिवसेना उबाठा सेनेकडून अस्मिता पेडणेकर, श्रीमती राणे इच्छुक आहेत. खांबाळे गण यावेळी खुला आहे. या मतदारसंघात खांबाळे,सांगुळवाडी, नावळे, सडूरे, शिराळे, एडगाव, सोनाळी या गावाचा समावेश आहे. या मतदारसंघातून सन 2017 साली शिवसेनेच्या तिकिटावर मंगेश लोके हे विजयी झाले होते तर सन 2012साली काँग्रेसकडून शुभांगी पवार विजयी झाल्या होत्या.
गेल्या वेळी या मतदारसंघातून विजयी झालेले उबाठा शिवसेनेचे मंगेश लोक हे सध्या भाजपवासी असून त्यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितले आहे. त्याचप्रमाणे माजी सभापती अरविंद रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्यासह नवलराज काळे, विनोद रावराणे, संजय गुरखे, गणेश पवार, उमेश पवार, उज्ज्वल नारकर, प्रकाश पाटील, संजय विश्वासराव, संजय रावराणे आदी नऊ उमेदवारांनी भाजपकडे तिकीट मागितले आहे तर उबाठा सेनेकडून स्वप्नील रावराणे, दीपक कदम इच्छुक आहेत.
लोरे गणात लोरे, गडमठ, आचिर्णे,अरुळे, निमअरुळे, कुर्ली आदी गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात सन 2017 साली भाजपाकडून लक्ष्मण रावराणे हे विजयी झाले होते. तर सन 2012 साली सुवर्णा रावराणे या काँग्रेसकडून विजयी झाल्या होत्या. या मतदारसंघात भाजपकडून माजी सभापती दिलीप रावराणे यांचे चिरंजीव सिद्धेश रावराणे, संतोष बोडके, उज्वल नारकर यांनी उमेदवारी मागितले आहे. शिवसेना उबाठा सेनेकडून या मतदारसंघातून लक्ष्मण रावराणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.