

Karul Ghat Landslide traffic jam
वैभववाडी : करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. तरेळे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवरची वाहतूक ठप्प झाल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक भुईबावडा व फोंडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे. यामुळे गुरुवारी सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. दरड हटवण्याचे काम संबंधित यंत्रणेच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
तालुक्यात गेले काही दिवस संततधार पडणाऱ्या पावसाचा फटका करुळ घाटाला बसला आहे. गुरुवारी सकाळी दरडीचा मोठा भाग रस्त्यावर येऊन पडला. मोठमोठ्या दरडी रस्त्यात आल्याने वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस तसेच संबंधित यंत्रणेमार्फत दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र दरडीचा मोठा भाग कोसळल्यामुळे मार्ग मोकळा करण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे.