कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीचे कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. वैभव नाईक यांनी गुरुवारी दुपारी कुडाळ येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अनंत मुक्ताई हॉल ते प्रांताधिकारी कार्यालय अशी महाविकास आघाडीने ढोल-ताशांच्या गजरात रखरखत्या उन्हात भव्य रॅली काढून लक्षवेधी शक्तिप्रदर्शन केले. आ. वैभव नाईक यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. आ. वैभव नाईक यांनी आमदारकीच्या सलग दोन टर्म या मतदारसंघात पूर्ण केल्या आहेत. आता तिसर्यांदा त्यांना ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीने कुडाळात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कुडाळ येथील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणात महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संबोधित केले.
त्यानंतर सभास्थळ ते गांधीचौक मार्गे प्रांताधिकारी कार्यालय अशी ढोलताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार आ. वैभव नाईक यांनी नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. तसेच ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले. आमदार वैभव नाईक, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रवीण भोसले, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी आमदार परशुराम उपरकर, जि.प.चे माजी अध्यक्ष सतीश सावंत, संग्राम प्रभूगावकर, शिवसेना उपनेत्या तथा महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, भाई गोवेकर, सौ. स्नेहा वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, सुशांत नाईक, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर परब, विजय प्रभू, नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, तालुकाप्रमुख योगेश धुरी, नगरसेवक उदय मांजरेकर, श्रेया गवंडे, सई काळप, श्रुती वर्दम, शिल्पा खोत, निनाक्षी शिंदे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, बाळा कोरगावकर, दीपक गावडे, राजेश टंगसाळी आदींसह शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीने जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे व मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे उपस्थित होत्या. दरम्यानच्या वेळी रॅलीत शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रतिमा असलेले फलक तसेच मशाल चिन्हाचे फलक, भगवे झेंडे हातात घेऊन तसेच गळ्यात पक्षाच्या शाली व डोक्यात भगव्या टोप्या परिधान करून आपला माणूस वैभव नाईक, वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आवाज कुणाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा... अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे शिवसेनेचे मशाल गीत ध्वनिक्षेपकावर लावून स्फूर्तिदायक वातावरण निर्माण करण्यात आले होते. यामुळे सर्वत्र मशालमय वातावरण निर्माण झाले होते. या रॅली दरम्यान ठाकरे शिवसेना शाखा तसेच पोस्ट ऑफीस चौक येथे पोलिस प्रशासनाकडून जादा पोलिस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. रॅली दरम्यानही ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. दरम्यान आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
... हीच आमच्या निष्ठेची पावती : आ. नाईक
महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या निवडणुकीत मी मोठ्या मताधिक्याने विजयी होईन. कारण सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. काल आजी माजी मुख्यमंत्री कुडाळात येवून माझ्या विरोधात बोलून गेले. परंतु त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? हे त्यांनी सांगितले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारात कोण होते? हेही त्यांनी सांगितले नाही. सामान्य नेत्याच्या पाठीशी सामान्य लोक असले तर त्या नेत्याला कुणीही हरवू शकत नाही. आजच्या सभेसाठी आम्ही कुणालाही बोलवलं नव्हतं, कार्यकर्ते स्वखुशीने आले होते. काहींना मात्र सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून गर्दीसाठी बोलवावे लागले आणि आमच्यासाठी भर उन्हात लोक थांबतात हीच आमच्या निष्ठेची पावती असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.