

वेंगुर्ले ः रेडी-सुकळभाटवाडी समुद्रकिनारी खडकामध्ये शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता सुमारे 40 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी बुधवारी रेडी-नागोळेवाडी येथे एक पुरुष मृतदेह आढळून आला होता. त्यापाठोपाठ महिलेचा मृतदेह सापडल्याने गूढ वाढले आहे.
याबाबत पोलिसपाटील सिताराम राणे यांनी शिरोडा पोलिसांना माहिती दिली. वेंगुर्ले पोलिस निरीक्षक संदीप भोसले, पीएसआय तुकाराम जाधव, पोलिस हवालदार योगेश राऊळ, दादा परब, राहुल बर्गे, अमर कांडर, योगेश वेंगुर्लेकर आदी घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान कोणाचेही नातेवाईक मिसिंग असल्यास वेंगुर्ले पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तुकाराम जाधव हे करीत आहेत.