

वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा
सांगुळवाडी येथील बी. फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणारा विराट उदयसिंह गायकवाड (वय २२, रा. आळवे कोतोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या विद्यार्थ्याचा रविवारी सायंकाळी आकस्मिक मृत्यू झाला. सायंकाळी सुमारे ४.५० वा. च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
विराट गायकवाड हा सांगुळवाडी येथील बी. फार्मसी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी २.३० वा. च्या सुमारास मित्रांसोबत चायनीज खाऊन तो भाड्याच्या खोलीवर परतला. काही वेळातच त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्याने रूम पार्टनर केतन माने याने इतर मित्रांच्या मदतीने त्याला तातडीने वैभववाडीतील खाजगी रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. विराट हा वैभववाडी बाजारपेठेतील भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली निधनामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून महाविद्यालयीन परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी वैभववाडी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.