

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर हुमरमळा (ता. कुडाळ) येथील टाटा मोटर्स शोरूम समोर झालेला अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दोघांना भरधाव डंपरने धडक दिली. या अघातात दोघेही ठार झाले. मंगळवारी सकाळी 7.15 वा.च्या सुमारास हा तिहेरी अपघातात झाला. अनुष्का अनिल माळवे (18, रा. अणाव दाबाचीवाडी) आणि विनायक मोहन निळेकर (22, रा. रानबांबुळी) अशी या मृतांची नावे आहेत.
दरम्यान, तत्पूर्वी इनोव्हा कारने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्वार गंभीर जखमी झाला. तर इनोव्हा कारमधील 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले. या अपघात प्रकरणी इनोव्हा व डंपर चालकांवर गाडी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुमरमळा येथील अपघाताबाबत अमोल रामचंद्र कुडाळकर (रा.ओरोस बोरबाटवाडी) यांनी फिर्यादीत दिली. कार दादर मुंबई ते दोडामार्ग -घोडगेवाडी जात होती. या कारने रोहीत कुडाळकर यांच्या मोटारसायकलला मागून धडक दिली. या अपघातात रोहीतच्या दोन्ही पायांना, कमरेला व डोक्याला दुखापत झाली आहे.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार इनोव्हा चालक विशाल सुनील चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विशाल सुनील चव्हाण (32, रा. दादर), सदानंद शंकर गोढे, (67, रा. कांदिवली), प्रेक्षा नाईक (8,रा. कल्याण), भारती नाईक,(49, रा. कल्याण), मनोज दळवी, (52, रा.भाईंदर), वैष्णवी दळवी (50, रा. भाईंदर), सुनिता दळवी (58, रा.बांदा), कौस्तुभ गोडे (26), सुष्मा गोडे (54), शैला दळवी (50, रा.भाईंदर) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातग्रस्त इनोव्हा रस्त्याच्या खाली पलटी झाली होती तर मोटारसायकल महामार्गावर पडली होती. तेथून दुचाकीने जाणारे विनायक मोहन निळेकर (22, रा. रानबांबुळी ) व त्याच्या सोबत असलेली अनुष्का अनिल माळवे (18, रा. अणाव) हे दोघे अपघात पाहण्यासाठी थांबले होते. याच वेळी सिंधुदुर्गनगरी ते कुडाळ जाणार्या डंपरने त्यांना धडक दिल्याने दोघेही डंपरखाली सापडून गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघातानंतर डंपर चालक सुनील विष्णु कोळकर (52, रा. वाडीवरवडे, ता. कुडाळ) हा डंपरसह पळून गेला. मात्र काही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद हरी चंद्रकांत पालव,(35, रा. हुमरमळा -राणेवाडी) यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीनुसार डंपर चालक सुनील विष्णू कोळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राजेंद्र दळवी करीत आहेत.
या अपघाताची माहिती मिळतात अति. पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपअधीक्षक विनोद कांबळे, सिंधुदुर्गनगरीचे सहा. पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी भेट दिली.
हुमरमळा येथील दुहेरी अपघातात एक युवक व एक युवती असे दोघेजण ठार झाले तर अकराजण जखमी झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात धडक दिली. मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली. पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे यांच्याशी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ओरोस प्रभारी मंडळ अध्यक्ष भाई सावंत आदींनी चर्चा केली.