Sindhudurg News : सावंतवाडीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली

महायुतीचे पदाधिकारी, माजी सैनिक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Sindhudurg News
सावंतवाडीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली
Published on
Updated on

सावंतवाडी : आमच्यासाठी आमचा देश आणि राष्ट्रहित हेच सर्वोतोपरी आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नंतर आहोत, मात्र प्रथम या देशाचे निष्ठावंत नागरिक आहोत. आमच्या तिरंग्यावर आमचे अनन्यसाधारण प्रेम आहे. जो कोणी या मातृभूमीला आपली आई मानतो आणि ज्याच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, तो प्रत्येक नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.

सावंतवाडी येथील उपरलकर देवस्थान येथून शुभारंभ झालेल्या  भव्य तिरंगा रॅलीचे उद्‌घाटन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. या रॅलीला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी सैनिक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीमुळे संपूर्ण सावंतवाडी शहर देशप्रेमाच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. रॅलीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री राणे यांनी देशप्रेमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, या रॅलीत सहभागी प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाबद्दल, राष्ट्र ध्वजाबद्दल आणि संस्कृतीबद्दल सार्थ अभिमान आहे. देशात राहणाऱ्या प्रत्येकाने ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणणे अत्यंत गरजेचे आहे. तिरंगा ही आमची शान आहे आणि आमचे रक्त भगवे आहे, याच भावनेतून आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत.

देशात राहूनही जे ‘वंदे मातरम्’ म्हणायला नकार देतात, त्यांना या देशावर प्रेम नाही. मदरसासारख्या संस्था ‘वंदे मातरम्’ म्हणत नाहीत, अशा संस्थांची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात यावी ही आपली मागणी आहे. तसेच जे ‘भारत माता की जय’ म्हणायला विरोध करतात, त्यांना पाकिस्तानमध्ये पाठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

रॅलीत आ. दीपक केसरकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, तिरंगा रॅलीचे संयोजक संदीप गावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा नेते विशाल परब, नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, सावंतवाडी सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, सिंधुदुर्ग बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, विद्याधर परब, जि. प. सदस्य विक्रांत सावंत आदींसह सरपंच तसेच महायुतीचे पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

ही तिरंगा रॅली श्री देव उपरलकर देवस्थान येथून तिरंगी शाल आणि तिरंगी झेंडे घेऊन निघाली. एसटी बस स्थानकासमोरून रॅली गांधी चौक येथे आली आणि तेथून जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानामध्ये विसर्जित झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news