

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील परुळे देऊळवाडी येथील कु. भूपेश निलेश परुळेकर (वय ३ वर्षे) या बालकाचा घराजवळ असलेल्या ओहोळाच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.
तो घरच्यांची नजर चुकवून ओहोळाच्या दिशेने गेला होता. तो घरात दिसून आला नाही म्हणून शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता तो ओहोळाच्या पाण्यात तरंगताना दिसून आला. त्याला तातडीने परूळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे व त्यानंतर कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो वाचू शकला नाही. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.