दोडामार्गमध्ये फ्लॅट फोडणारा चोरटा हैदराबाद येथे जेरबंद

खिडकीचे गज कापून चोरी,www.pudhari.news
खिडकीचे गज कापून चोरी,www.pudhari.news

दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : दोडामार्ग शहरातील फ्लॅट भरदिवसा फोडून चोरी केलेल्या संशयिताच्या अवघ्या महिन्याभरातच मुसक्या आवळण्यात दोडामार्ग पोलिसांना यश आले आहे. चोरट्याने चोरलेल्या मोबाईलद्वारे शोध घेत त्याला हैदराबाद येथून ताब्यात घेतले. मोहम्मद सोहेल कुरेशी (24, रा. जमालकुंडा, गोवळकुंडा, हैदराबाद शहर) असे संशयित चोरट्याचे नाव असून, मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दोडामार्ग नगरपंचायत गार्डन नजीकच्या 'पद्मावती प्लाझा' या इमारतीमध्ये पुंडलिक दत्ताराम गवस (रा. मांगेली) यांचा फ्लॅट आहे. रविवारी 31 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ते पत्नीसमवेत मांगेली येथे काजू बागायतींमध्ये गेले होते. सायं. 6.45 वा. च्या सुमारास ते आपल्या फ्लॅटमध्ये परतले असता चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप लॅच तोडून फ्लॅट फोडल्याचे निदर्शनास आले. फ्लॅटमधील हॉलमध्ये सोफासेटवर गवस यांचा 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल होता. तसेच बेडरूममधील लाकडी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये रोख 68 हजार रुपये होते. तर दुसर्‍या बेडरूममधील लोखंडी कपाटात दीड तोळ्याची अंगठी होती. चोरट्यांनी रोख रकमेसहित अंगठी व मोबाईलवर डल्ला मारून ते लंपास केले. गवस यांनी तातडीने या संदर्भात दोडामार्ग पोलिसांना तक्रार दाखल केली.

दोडामार्ग पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र पोलिसांना अडचणी येत होत्या. चोरीस गेलेल्या मोबाईलमध्ये शनिवारी दुपारी नवीन सिमकार्ड घातले गेले अन् त्यामुळे पोलिसांचे काम सोपे झाले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासले असता ते सिमकार्ड हैदराबादमध्ये असल्याचे निषन्न झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपअधीक्षक संध्या गावडे, पोलिस निरीक्षक अरुण पवार, सहा.पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंद नाईक, हवालदार विठोबा सावंत, शिपाई लक्ष्मण पुजारी व चालक फिलिप्स सोज यांचे पथक शनिवारी सायंकाळी हैदराबादला रवाना झाले. रविवारी दुपारी 1 वा.च्या सुमारास ते हैदराबाद पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. स्थानिक पोलिसांसह ते संशयीताच्या पाळतीवर राहिले. दुसर्‍या दिवशी सोमवारी दुपारी संशयित मोहम्मद कुरेशी तेथील बाजारपेठेत फिरताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. दोडामार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याला दोडामार्ग येथे आणले. मंगळवारी त्याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

गोव्याला जाताना फ्लॅट फोडला!

संशयिताला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत सर्व हकिकत कथन केली. मोहम्मद कुरेशी म्हणाला, तो 31 डिसेंबर रोजी दोडामार्गे गोव्याला पर्यटनासाठी जात होता. मात्र काही कामानिमित्त तो दोडामार्गात थांबला अन् चोरीच्या इराद्याने शहरातील एका इमारतीत घुसला. त्या इमारतीमधील बंद फ्लॅटचा अंदाज घेऊन फ्लॅट फोडला. फ्लॅटमधील 20 हजार किंमतीचा मोबाईल, रोख 68 हजार रुपये व दीड तोळ्याची अंगठी असा ऐवज चोरल्याची त्याने कबुली दिली.

चोरट्यावर 27 गुन्हे!

दोडामार्ग पोलिस त्या चोरट्याला पकडण्यासाठी हैदराबाद येथे गेले असता तेथील पोलिस ठाण्यात त्याच्यावर वेगवेगळे 27 गुन्हे दाखल असल्याची माहिती तेथील पोलिसांनी दिली. दोडामार्गातील या घरफोडीत तो एकटाच होता की, त्याचे अन्य साथीदार यात सामील आहेत? याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news