दोडामार्ग ः गेल्या पंधरा वर्षांत सावंतवाडी मतदारसंघाचे स्थानिक आमदार विकास, रोजगार, आरोग्य यासारख्या मूलभूत सोयी सुविधा आणू शकले नाहीत, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे त्यांना आता पराभवाची भीती वाटू लागली आहे. आमच्या बाजूने जनशक्तीचा वाढता कौल बघून ते काहीही बोलत सुटले आहेत. ते आता पराभवाकडे झुकत आहेत, असा टोला सावंतवाडी मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांनी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना लगावला.
दोडामार्ग येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सोबत नकुल पार्सेकर, सुभाष दळवी, संदीप गवस, प्रदीप चांदेलकर, ममता नाईक, प्रिया देसाई, सुदेश तुळसकर , उल्हास नाईक, सुभाष लोंढे, गौतम महाले, महादेव देसाई व कार्यकर्ते उपस्थित होते.
घारे म्हणाल्या, मतदारसंघात प्रचार करत असताना महिला आमच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. गेली 15 वर्षे सत्तेत असणार्यांनी आमच्यासाठी काहीही केले नाही. रोजगार आणू शकले नाहीत, विकास नाही, रस्ते नाहीत, अशा प्रतिक्रिया देणारी जनता आता बदल घडवण्यासाठी तयार आहे. दोडामार्गमध्ये जंगली प्राण्यांच्या प्रश्नामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. झाड तोडल्यास त्याला 50 हजार दंड आकारण्यात येत आहे. तो दंड शिथिल करण्यासाठी प्रयत्न करेन. रस्ते बांधकाम करताना 5 वर्षे गॅरंटीचे रस्ते करून भ्रष्टाचारमुक्त कारभार आपण करणार आहे.(Maharashtra assembly poll)
जनता सुज्ञ आहे. त्यामुळे येणार्या 20 तारखेला या तिन्ही उमेदवारांना जनता मतपेटीतून उत्तर देणार आहे. यावेळी ‘जनशक्ती’ ही ‘धनशक्ती’समोर झुकणार नाही, असा विश्वास अर्चना घारे यांनी व्यक्त केला.