

सावंतवाडी : प्रस्तावित नागपूर-गोवा या शक्तिपीठ महामार्गाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या महामार्गामुळे शेतकर्यांच्या हजारो एकर जमिनींचे नुकसान होणार असून कोकणातील पर्यावरणाचा समतोल बिघडणार असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी खा. विनायक राऊत यांनी केला आहे. या महामार्गाला विरोध करणार्या शेतकर्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीर उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत विनायक राऊत बोलत होते. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा महिला संघटक श्रेया परब, तालुका प्रमुख मायकल डिसोझा, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब, शैलेश गवंडळकर, गुणाजी गावडे, विशांत तोरस्कर, रमेश गावकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्ग सुमारे 800 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे शेतकर्यांची 27 हजार एकर शेतजमीन रस्त्याखाली जाणार आहे. तसेच 300 फूट रुंदीच्या या महामार्गामुळे कोकणातील निसर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला. सिंधुदुर्गातील बारा गावांनी या महामार्गाला विरोध दर्शवला असून ठाकरे शिवसेना आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते या शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या पक्षाचे डॉ. जयेंद्र परुळेकर हे या आंदोलनाचे नेतृत्व पहिल्यापासूनच करत आहेत. शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही रणांगणात उतरलो आहोत. हिंमत असेल तर आमचे आंदोलन धमकी देणार्यांनी मोडून दाखवावे, असे आव्हान विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिले.
शक्तिपीठ महामार्गापेक्षा कोकण पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्ग आणि कोस्टल रोड (सागरी महामार्ग) येथील जनतेला महत्त्वाचा आणि फायद्याचा असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. तसेच, चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग-मुंबई विमान सेवा सुरू करण्याची ताकद खा. नारायण राणे यांच्यात नसल्याचा आरोप त्यांनी केला. सावंतवाडीसाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आ.दीपक केसरकर यांनी रखडविल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रस्तावित संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग हा दाणोलीतून बाहेर नेला जात असून सावंतवाडी शहरातून हा मार्ग जावा अशी मागणी विनायक राऊत यांनी केली.
दीपक केसरकर यांची भूमिका ‘सरशी तिथे पारधी’ अशी असून केसरकर यांची भूमिका कायमच संधीसाधूपणाची राहिली आहे. ते एकनाथ शिंदेशी काडीमोड घेऊन भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्या तंबूमध्ये जातील आणि भारतीय जनता पार्टी मधून पुन्हा एकदा तिकीट मागून घेतील, अशी टीका विनायक राऊत यांनी माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांच्यावर केली.
एकीकडे रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग होत असताना वेगळ्या शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? असा सवाल माजी खा. विनायक राऊत यांनी केला आहे. आमचा आंबा नागपुरात नव्हे तर परदेशात जायला हवा. दुसरीकडे चिपी विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करून आमचा आंबा परदेशात पाठवणे आवश्यक आहे. तसेच मोपा येथून कार्गोसेवा सुरू करून येथील कलिंगड दिल्लीत जायला हवे यासाठी राज्यकर्त्यांकडून प्रयत्न व्हायला हवा. परंतु तसे न होता आमचा आंबा केवळ नागपूरपर्यंत नेण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग हवा असल्याचे म्हणणार्या आ. दीपक केसरकर यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले. हा शक्तिपीठ म केवळ खा. राणे व आ. केसरकर यांच्या उत्कर्षाचा आहे तर शेतकरी आणि बागायतदारांच्या नुकसानीचा आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली.
विकासाला आमचा विरोध नाही; मात्र जमिनी हडप करण्याच्या विरोधात आम्ही आहोत. पोकळ धमक्या देण्याचा खा. नारायण राणे यांचा मूळ स्वभाव गेलेला नाही हे दुर्दैव आहे. शक्तिपीठाला विरोध करणार्या शेतकर्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. हिंमत असेल तर आमच्या तंगड्या तोडायला या. आम्ही सत्याच्या बाजूने असून शेतकर्यांना नामशेष करणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असे आवाहन विनायक राऊत यांनी खा. नारायण राणेंना दिले.