

नांदगाव : कणकवली तालुक्याच्या ग्रामीण भागातून नांदगावमार्गे कणकवलीच्या दिशेने गुरे वाहतूक करणारा एक घाट माथ्यावरील महिंद्रा पिकअप टेम्पो बेळणे-लतानगरी दरम्यान पाठलाग करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडला. यात गुरे आढळून आली. ही घटना शुक्रवारी सकाळी 10.45 वा. च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर बेळणे-लतानगरी दरम्यान घडली.
यावेळी बजरंग दलाचे सागर डंबे, निखिल पिसे, तेजस भांबुंरे, सनी पाताडे, श्री. खरात, अमोल गावकर, प्रदीप हरमलकर,श्रीकृष्ण वायंगणकर, प्रतिक भाट आदी बहुसंख्येने कार्यकर्ते दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळताच नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, बेळणे उपसरपंच पंढरीनाथ चाळके,बेळणे पोलिसपाटील श्री. चाळके आदी दाखल झाले.
याबाबत कणकवली पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक श्री. शेडगे यांच्यासह पोलिस फौजफाटा दाखल झाल्याने सदर गुरे वाहतूक करणार्या टेम्पोसह चालकाला कणकवली पोलिस ठाण्यात अधिक तपासासाठी नेण्यात आले. दरम्यान, टेम्पोतील सर्व गुरे जप्त करून ती गो शाळेत द्यावीत तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी यावेळी केली.