

सावंतवाडी : गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील शिक्षक विजयकुमार गुरव याचा खून करून त्याचा मृतदेह आंबोली- कावळेसाद पॉईंट येथील दरीत टाकल्या प्रकरणात कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सुरेश आप्पासो चोथे हा कारागृहातून फरार झाला आहे. कारागृहातील अधिकारी व कर्मचार्यांचा विश्वास संपादन करत त्याने कार वॉशिंग सेंटरवरून ग्राहकाची कार घेऊन पळ काढला. यामुळे गडहिंग्लज येथील शिक्षक हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील प्राथमिक शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या पत्नीचे शेजारीच रहाणार्या सुरेश चोथे याच्या सोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबधात पतीचा अडथळा होत असल्याने गुरव यांच्या पत्नीने प्रियकर सुरेश चोथे याला सोबत घेत राहत्या घरातच 6 नोव्हेंबर 2017 रोजी मध्यरात्री विजयकुमार गुरव यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह आंबोली-कावळेसाद पॉईंटच्या खोल दरीत फेकला होता.
दरम्यान, घटनास्थळावर रक्ताचे डाग पडल्याचे पाहून स्थानिकांनी ही माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली. सावंतवाडीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील धनावडे या माहितीच्या आधारे पोलिसांनी कावळेसाद पॉईंटच्या खोल दरीत बाबल आल्मेडा यांची टीम उतरवून खात्री केली असता एक मृतदेह खोल दरीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर हा मृतदेह वर आणण्यात आला. पोलिसांकडून त्यानंतर या मृतदेहाची माहिती महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आली.
दरम्यान गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव हे दोन दिवसापासून बेपत्ता असल्याचे पुढे आले. त्याचा शोध घेत असतना ऐकामागोमाग असे क्लू सापडत गेले आणि पोलिसांनी आरोपी शिक्षक गुरव यांची पत्नी जयालक्ष्मी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे यांच्या घटनेनंतर अवघ्या चार ते पाच दिवसातच मुसक्या आवळल्या. त्यानंतर येथील सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात याबाबतची सुनावणी झाली आणि दोन्ही आरोपींना हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवून ऑगस्ट 2022 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.