

नांदगाव : तळेरे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडची दुरावस्था झाल्याने गलथान व ढिसाळ कारभार त्वरित थांबवून तातडीने कामे हाती घ्यावीत, असे निवेदन तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांनी दिल्यानंतर महामार्ग प्राधिकरण ठेकेदाराकडून बसस्थानक व तळेरे बाजारपेठ परिसरात रस्त्यावर पाणी मारण्यात आले. मात्र तळेरे ओव्हर ब्रीजखाली व बाजारपेठेत दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्त्यांचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
तळेरे येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याची दुर्दक्षा झाली आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिक, व्यापारी, वाहन चालक, विद्या र्थी अश्या सर्वांनाच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तळेरे येथे महामार्गाच्या दोन्ही बाजुचा सर्व्हिस रस्ता उखडला आहे. या रस्त्यावर पडलेले खोल खड्डे, चिखल, वाढती धूळ आरोग्यावर परिणाम होत आहे.
याबाबत तळेरे सरपंच हनुमंत तळेकर व स्थानिकांनी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या इशार्यानंतर जाग आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण उपविभाग खारेपाटण कार्यालयाकडून ठेकेदाराचे कान टोचण्यात आले. या नंतर ठेकेदाराने शुक्रवारी या रस्त्यावर पाणी मारत तात्पुरती उपाययोजना केली. याबाबत सरपंच सरपंच हनुमंत तळेकर यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
मात्र, ओव्हर ब्रीजखालील जागेसह तळेरे बाजारपेठेतून कणकवलीकडे व खारेपाटणकडे जाणार्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात धुळ साठली आहे. या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करून पाण्याचा योग्य निचरा करण्याची गरज आहे. अन्यथा पुढील पावसात अशीच दुरावस्था होण्याची शक्यता आहे.