

उदय बापर्डेकर
आचरा : तोंडवळी-तळाशील येथील रस्त्यालगत मांगरीत ठेवलेल्या तेरेकर रापण संघाच्या तीन होड्यांना सोमवारी सायंकाळी 4 वा. च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत होड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. तेथे असलेल्या एका पर्यटकाच्या निदर्शनास होड्यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्याने आराडाओरड करत ग्रामस्थांना यांची माहिती दिली. स्थानिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र आगीचा भडका जास्त असल्याने काही क्षणातच होडी ठेवण्याच्या मांगरीसहित होड्या जळून खाक झाल्या. या आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. आग लागल्याचे समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते.
या आगीत रापणीच्या होड्या जळून खाक झाल्या असून सुमारे 40 मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह हिरावला गेला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वार्यामुळे आग वेगाने पसरली अन् काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत होड्या इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेमुळे रापणी मासेमारीवर अवलंबून मच्छीमार कुटुंबांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. आगामी मासेमारी हंगामावरही याचा गंभीर परिणाम होणार आहे. या आगीत होडी ठेवण्याच्या मांगरीत दोन होड्या, एक फायबरची पात, 200 किलोचे नायलॉन रोप, होड्या ओढताना वापरल्या जाणार्या पाच उंडली असे सामान जळून खाक झाले. यात दोन होड्या, एक फायबर पात, रोप, उंडली असे मिळून 10 लाखाचे सामान, तसेच मांगरीचे सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले.
सोमवारी सायंकाळी 4 वा.च्या सुमारास तळाशील रस्त्यालगत असलेल्या होड्या ठेवण्याच्या मांगरीमधुन धूर व आगीच्या ज्वाळ येतानाा रस्त्यावरून जाणार्या पर्यटकास दिसल्या. त्याने तातडीने ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आणली. ग्रामस्थांनी धाव घेत लागलीच आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, किनार्यावरून वार्याचा जोर असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
संघाच्या सदस्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न
तेरेकर रापण संघाचे 40 सदस्य आहेत. या सर्व सदस्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या रापण मासेमारीवर अवलंबून आहे. मात्र या दुर्घटनेत रापणी संघाच्या तीनही होड्यांसह मासेमारी साहित्यही बेचिराख झाल्याने या 40 कुटुंबांचे उत्पन्नाचे साधनच नष्ट झाले असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक कुटुंबांमध्ये वृद्ध, महिला व शिक्षण घेणारी मुले असून त्यांच्या दैनंदिन खर्चासह शिक्षण व कर्जफेडीचा भार कसा पेलायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने मदत न केल्यास या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
आगीत जळालेल्या होड्यांपैकी दोन होड्या नुकत्याच नव्याने तयार करण्यात आल्या होत्या. या होड्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. त्या पूर्णपणे जळून खाक झाल्याने नुकसानाचे प्रमाण वाढले असून पारंपरिक रापण संघाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नवीन होड्या तयार करण्यासाठी संघातील सदस्यांनी आर्थिक ओढाताण केली होती. मात्र उत्पन्न सुरू होण्या अगोदरच त्या आगीत नष्ट झाल्याने रापण संघासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.