

सिंधुदुर्ग : मळलेल्या वाटेने न जाता संवादाचा वेगळा मार्ग अनुसरून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अथक परिश्रम घेत, चिकाटी ठेवत ताज प्रकल्पाच्या उभारणीसाठी त्रिपक्षीय करार अस्तित्वात आणण्याचे ध्येय अखेर गाठलेच. दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेला हा ऐतिहासिक करार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या मार्गावरील माईल स्टोन ठरला आहे. या करारामुळे पालकमंत्र्यांच्या रिव्हर्स मायग्रेशन मोहिमेला निश्चितच बळ मिळाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आणि जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न पाच लाखापर्यंत नेण्याचे जे पालक मंत्र्यांनी ठरवले आहे त्यासाठी हा ताज प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. हा प्रकल्प उभा राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे द्वार खुले होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिकलेले तरुण-तरुणी रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित होत असताना त्यांना पुन्हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी 'रिव्हर्स मायग्रेशन`हे धाडसी मिशन पालक मंत्र्यांनी सुरू केले आहे.
शहरात गेलेले तरुण पुन्हा माघारी परततील
रोजगाराच्या निमित्ताने तरुण मुले आपल्या आई-वडिलांपासून दूर शहरांमध्ये अनेक समस्यांना तोंड देत राहत आहेत, त्या मागच्या वेदना पालकमंत्र्यांनी हल्लीच स्वातंत्र्यदिनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केल्या होत्या. सिंधुदुर्गातून रोजगारासाठी बाहेर गेलेले तरुण पुन्हा आपल्या जिल्ह्यात यावेत आणि शहरांपेक्षा अधिक दर्जेदार आणि जास्त वेतन देणारा रोजगार उपलब्ध व्हावा हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर अवघ्या चार दिवसात ताज हॉटेल प्रकल्पासाठीचा त्रिपक्षीय करार घडवून आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत, हे खूपच आशादायी चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पर्यटन मंत्री यांच्या उपस्थितीत हा करार झाला हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्याशिवाय राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. या कराराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे की, या करारातील तीन पक्षांपैकी एक पक्ष हा शिरोडा वेळागर येथील स्थानिक नागरिक हा होता. हॉटेल कंपनी पर्यटन महामंडळ आणि स्थानिक नागरिक संघ यांच्यात हा करार झाला आहे.या कराराच्या यशस्वी ते नंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी जो व्हिडिओ बनवला तो पाहिल्यानंतर या करारा मागची मेहनत आणि यशाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होताच त्याशिवाय झालेल्या करारानुसार लवकरात लवकर हा हॉटेल प्रकल्प उभारणीचा आत्मविश्वास ही दिसत होता.
हजारो कोटींची गुंतवणूक आणि मोठा रोजगार
या पंचतारांकित हॉटेल प्रकल्प उभारणीसाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या उभारणीच्या वेळी रोजगार निर्माण होईल. त्याशिवाय प्रत्यक्ष हॉटेल जेव्हा सुरू होईल तेव्हा देखील १००० पेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला या प्रकल्पामुळे चमक येईल,एवढेच नव्हे तर देश आणि जगभरातील पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्या चा दबदबा वाढणार आहे.
सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल २८ निसर्गरम्य समुद्रकिनारे आहेत.त्यातील शिरोडा -वेळागर समुद्रकिनारा पंचतारांकित ताज हॉटेल प्रकल्पासाठी खुणावत होता. साधारणता २६ वर्षांपूर्वी त्या वेळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी हा प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न सुरू केला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास वेगाने व्हावा यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणूनही सरकारकडून जाहीर करून घेतला.परंतु हा ताज प्रकल्प थांबला. त्यावेळी स्थानिकांचा विरोध आणि इतर कारणांनी प्रकल्प पुढे जाऊ शकला नव्हता.
पालकमंत्र्यांकडून सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चिकाटी
दीड वर्षांपूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासात क्रांती घडू शकणारा पंचतारांकित ताज हॉटेल प्रकल्प उभारणीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. यावेळी त्यांनी संवादाचा मार्ग अवलंबला. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्याशी संवाद वाढवून त्यांचे सहकार्य मिळवले.स्थानिकांशी चर्चा सुरू केली . स्थानिकांच्या काय मागण्या आहेत यावर सकारात्मक निर्णय झाले . ताज प्रकल्प उभारणारी हॉटेल कंपनी सहजासहजी तयार होणारी नव्हती.कारण यापूर्वीचा अनुभव त्यांच्याकडे होता.ताज प्रकल्पांच्या हॉटेल कंपनीशी संवाद सुरू केला. त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला.
अखेर अथक प्रयत्नानंतर हॉटेल कंपनी तयार झाली.आता प्रश्न होता पर्यावरण विभागाच्या परवानगीचा.समुद्रकिनारी एवढा मोठा प्रकल्प उभारताना पर्यावरणीय परवानगी आवश्यक होती.ही परवानगी केंद्रीय पर्यावरण खात्याकडून मिळणार होती.परंतु ही परवानगी देण्यासाठी जी पर्यावरण समिती अस्तित्वात असायला हवी ती पर्यावरण समिती गठीत झालेली नव्हती. पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्ली गाठली आणि पर्यावरण मंत्रालयाशी सतत संपर्क ठेवून समिती गठीत व्हावी यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश येत समिती गठीतही झाली.अखेर गेल्या डिसेंबर महिन्यात या प्रकल्पासाठी पर्यावरण खात्याची परवानगी मिळाली.तेव्हा वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणूक सुरू होत्या. पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देताना त्यांनी चक्क पर्यावरण खात्याची परवानगीची प्रतच पत्रकारांना दाखवली.
आता कराराची पूर्तता होणे आवश्यक होते, स्थानिकांना विश्वासात घेत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत हॉटेल कंपनीला राजी करत अखेर पालकमंत्र्यांनी त्रिपक्षीय करार यशस्वी केला आहे. आत्ता ताज हॉटेल प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. एका अर्थाने म्हणायचे झाले तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे द्वार आता खुले झाले आहे.
इतर हॉटेल प्रकल्पही येतील
हॉटेल उभारणारी आता काही एकच कंपनी नाही, देशात आणि जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत. जिथे ताज प्रकल्प उभारला जातो आहे, अर्थातच तिथे इतर हॉटेल कंपन्यांच्या नजरा वळल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला अशा पंचतारांकित हॉटेलची गरज आहेच, जेवढी हॉटेल्स जास्त उभारली जातील तेवढे पर्यटक मोठ्या संख्येने येतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सध्या देशभरातील पर्यटकांची आवडती स्थळे बनली आहेत. पर्यटकांना भुरळ घालणारे स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळे जगभरातल्या पर्यटकांनाही खुणावत आहेत. त्यामुळे ताज हॉटेल प्रकल्पाच्या उभारणी पाठोपाठच इतर कंपन्या हॉटेल उभारण्यास उत्सुक आहेत. पालकमंत्र्यांचे प्रयत्न त्यासाठी सुरू आहेत. म्हणूनच त्यांनी 'ये तो ट्रेलर हैं....पिक्चर अभी बाकी हैl` असे उत्साहाने आणि आनंदाने म्हटले आहे.
पर्यटन व्यावसायिकांना मोठी संधी
जेव्हा अशी हॉटेल उभी राहतात तेव्हा पर्यटकांना वॉटर स्पोर्टस् व इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांना फार मोठा वाव मिळतो. आजच्या घडीला मालवणमध्ये पर्यटन व्यवसाय बऱ्यापैकी तेजीत आला आहे. अशी हॉटेल उभारणी झाल्यास संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्ध होईल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर इतकी करण्याचे उद्दिष्ट आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वाटा मोठा असावा असे पालकमंत्री नितेश राणे यांना वाटते आहे. रोजगारासाठी शहरात गेलेला तरुण पुन्हा माघारी परतेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची आर्थिक उन्नती आणखी वेगाने होईल यासाठी पालकमंत्र्यांचे हे सर्व प्रयत्न आहेत. स्वातंत्र्यदिनी झालेल्या संपूर्णभाषणात पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकरी, बागायतदार आणि मच्छिमार यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्याबरोबरच जिल्ह्याचा पर्यटन विकास त्यांनी समोर ठेवला.याचाच अर्थ रोजगार निर्मिती आणि त्यातून आर्थिक समृद्धी हे हे उद्दिष्ट स्पष्ट केले आहे. हे करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैद्य धंदे पूर्णपणे नष्ट करून जिल्ह्याचा क्राईम रेट कमीत कमी करण्याचा इरादाही त्यांनी बोलून दाखवला आहे. या सर्व गोष्टीचा फायदा पर्यटन विकासालाही होईलच, कारण, पर्यटकांना सौंदर्याबरोबरच सुरक्षितता आणि शांतता हवी असते.