

मुंबई : मत्स्यव्यवहार आणि बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश नारायण राणे यांच्या मंत्रालयाजवळील सुवर्णगढ बंगल्यावर रविवारी सकाळी एक संशयास्पद बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे पोलिसांसह भाजप कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, या घटनेने बंगल्यावरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन एक तरुण ही बॅग तिथे ठेवून गेल्याचे दिसून आले असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. नितेश राणे हे भाजप नेते आणि राज्याचे मंत्री आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक विषयांवर वादग्रस्त विधान केले होते. अशा विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. रविवारी सकाळी त्यांच्या मंत्रालयाजवळील सुवर्णगढ या शासकीय बंगल्यावर एक संशयास्पद बॅग सापडली होती. ही बॅग सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास येताच त्याने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती.
या माहितीनंतर स्थानिक पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकातील अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. या पथकाने बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. बंगल्यासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर एक तरुण बंगल्याजवळ आला आणि त्याने ती बॅग तिथे ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे या संपूर्ण घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरु केली आहे. दरम्यान सकाळी सापडलेल्या या बॅगेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.