देवगड : देवगड समुद्रात मासेमारी करताना तांडेलचा निर्घृण खून करून नौका जाळल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला संशयित खलाशी जयप्रकाश धनवीर विश्वकर्मा (27, मूळ रा. छत्तीसगड) याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला कुडाळ न्यायालयासमोर हजर करण्यात आले. कुडाळ न्यायालयाने संशयित जयप्रकाश विश्वकर्मा याला 14 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संशयित विश्वकर्मा याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी देवगड समुद्रात रत्नागिरी येथील नूजत राबिया ही पर्ससीन नौका मासेमारी करीत असताना या नौकेवरील तांडेल रवींद्र काशीराम नाटेकर (रा. साखरी आगार, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांचा नौकवरील खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा याने किरकोळ वादातून खून केला होता. नाटेकर यांच्या मानेवर सुरीने सपासप वार करून त्यांचे शिर धडापासून वेगळे केले होते. तसेच संशयित खलाशी विश्वकर्मा याने नौकेला आग लावून नौका पेटवून दिली होती.
या घटनेत नौकेवरील इतर सर्व खलाशांना वाचविण्यात यश आले होते. मात्र नौका सुमारे 90 टक्के जळून सुमारे दीड कोटीचे नुकसान झाले. या घटनेतील मुख्य संशयित विश्वकर्मा याला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. संशयिताने गुन्ह्याची कबुलीही दिली होती. या गुन्ह्यात संशयिताला देवगड न्यायालयाने 31 ऑक्टोबरपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.