

कणकवली ः पाकिस्तानला जशासतसे उत्तर देऊन भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. देशाची मान आणि अभिमान उंचावण्याचे काम तिन्ही दलाचे सैनिक करत आहेत, त्याबद्दल जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून आपण त्यांचे अभिनंदन करतो. जिल्हावासियांनीही देशाचे नागरिक म्हणून भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढवण्याचे काम केले पाहिजे. कुठेही त्यांच्या शौर्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होवू नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकार जे जे निर्देश देईल, ते पालन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे ना. राणे यांनी सांगितले.
कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारकडून मॉकड्रीलसह अधिकृत माध्यमातून जे जे आवाहन केले जाईल, त्या प्रत्येक सुचनांचे पालन नागरिक म्हणून सर्वांनी करायला हवे. प्रशासनाने जे मॉकड्रील केले त्याला नागरिकांनी चांगले सहकार्य केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश अतिरेकी आणि जिहाद्यांविरोधात खंबीरपणे लढा देत आहे. भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्याची वेळोवेळी माहिती भारतीय सैन्यदलाच्या अधिकार्यांकडून जनतेला दिली जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्या सैन्याचे मनोबल वाढवणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
या काळात रक्तदानासारख्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दद्या, कायद्याच्या चौकटीत राहून नियमांचे पालन करून तिरंग्याची रॅली काढण्यास पत्रकार परिषदेत ते बोलतप्रशासनाकडून परवानगी दिली जाईल.जिल्हयातील जनतेने वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारला तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले आहे, यापुढेही सहकार्य करावे. असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.
किनारपट्टी सुरक्षेबाबत केंद्राकडून आलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेतली. मत्स्य व्यवसाय आणि बंदरविकास खात्याचा मंत्री म्हणून आपण मच्छीमार बांधवांना आवाहन करतो, केंद्र व राज्य सरकारच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे, कोणीही अतिउत्साह दाखवू नये. किनारपट्टी सुरक्षेसाठी पोलिस, बंदर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेवून सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकाचे आधारकार्ड तपासले जाणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. जिल्हयातील मदरशांवरही प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून प्रसंगी सर्च ऑपरेशन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मालवण-राजकोट येथे उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे रविवार 11 मे रोजी दुपारी 12.30 वा. मालवणात येणार आहे. यावेळी सा.बां.मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. काही महिन्यापूर्वी शिवरायांचा पुतळा पडल्याने जो ठपका लागला होता, तो आता दूर झाला आहे. हा भव्य पुतळा आता वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या पाहायला मिळणार आहे. सर्वांना अभिमान वाटावा असे या पुतळयाचे काम झाले आहे, असेही यावेळी ते म्हणाले.
राजकोट येथील शिवपुतळा परिसरात माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टी लवकरच उभी राहणार आहे. त्याकरिता या प्रकल्पासाठी खासगी जागा संपादित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सुमारे 100 कोटी खर्च करून महाराष्ट्र शासन ही शिवसृष्टी उभारणार आहे. आ. नीलेश राणे यांनी या पुतळ्याच्या परिसराच्या सुशोभिकरणाची मागणी केली असून डीपीडीसीमधून हे सुशोभिकरणाचे काम केले जाईल अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.