

सावंतवाडी : सावंतवाडी जुना बाजार कामतनगर येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्याने पालकांनी फोन दिला नाही म्हणून दोरीने गळफास घेत जीवन संपविले. शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजता ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मूळ गाव नेमळे येथील असलेल्या या अल्पवयीन मुलाचे कुटुंब सावंतवाडी जुना बाजार कामतनगर येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. आई-वडील संध्याकाळी कामनिमित्त बाहेर गेले असता मुलाने दरवाजा बंद करून घरातील फॅनला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आई-वडील रात्री पावणे नऊ वा घरी आले असता त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, पो मनोज राऊत पो धोत्रे यांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. हा मुलगा सावंतवाडी शहरात दहावी इयत्तेत शिकत होता. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.