

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील कास गावामध्ये शांतपणे स्वच्छंद विहार करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीवर चक्क पेटत्या मशाली फेकण्याचा अमानुष प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह वन्यजीव प्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेत वन विभागाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या ३ वनरक्षक आणि ४ हाकारे अशा एकूण ७ जणांना वन विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी दिला आहे.