

देवगड ः देवगड-जामसंडे शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकरिता जामसंडे येथील एक जागेसंदर्भात संबंधित जमीन मालकाशी चर्चा सुरू आहे. संबंधित जागेतील अन्य सहहिस्सेदारांची संमती व लगतचे जमीनदार यांची नाहरकत बाबी पूर्ण करून त्या जागेसंबंधी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती न. पं. मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी न. पं. विशेष सभेत दिली. दरम्यान, मोकाट गुरांच्या मालकांना आठ दिवसांची नोटीस देऊन बंदोबस्त करण्याची सक्त ताकीद द्यावी, अन्यथा त्या गुरांचा ताबा घेऊन लिलाव प्रक्रिया करावी किंवा मोकाट गुरे गोशाळेत देण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, असा ठराव सभेत घेण्यात आला.
देवगड- जामसंडे नगरपंचायतीची विशेष सभा बुधवारी सायंकाळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली न. पं. सभागृहात झाली. उपनगराध्यक्षा मिताली सावंत, सभापती शरद ठुकरुल, अॅड. प्रणाली माने, आद्या गुमास्ते, उपसभापती रुचाली पाटकर, नगरसेवक तन्वी चांदोस्कर, संतोष तारी, नितीन बांदेकर, निवृत्ती तारी, रोहन खेडेकर, मनीषा जामसंडेकर, विशाल मांजरेकर, स्वरा कावले, व्ही. सी. खडपकर, सुधीर तांबे, मुख्याधिकारी कांबळे आदी उपस्थित होते. घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन घंटागाडी इंधनाची उपलब्धता लक्षात घेऊन खरेदी करावी. सीएनजी इंधन पुरवठा नियमित होणारा असेल तर तसा निर्णय घेण्यात यावा, असे मत अॅड. माने यांनी मांडले.
यावर निवृत्ती तारी यांनी पेट्रोल, डिझेलची उपलब्धता असून त्याप्रमाणे गाड्या खरेदी कराव्यात, असे सुचित केले. मुख्याधिकारी कांबळे यांनी सहा घंटागाडी खरेदीचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. तसेच अन्य साहित्य खरेदी केले जाईल, असे सांगितले. या प्रस्तावाला नगरसेवकांनी एकमताने मान्यता दिली.
मोकाट गुरांप्रश्नी कायम तोडगा काढण्यासाठी सर्व मोकाट गुरे गोशाळेत देण्यात यावी, असे नगरसेवक संतोष तारी यांनी सांगितले. यावर प्रथम संबंधित गुरे मालकांना नोटीसा काढण्यात यावी. आठ दिवसांत गुरे ताब्यात घेण्यात आली नाहीत, तर त्याची लिलाव प्रक्रिया करून गुरे गोशाळेत देण्यात येतील, असे जाहीर करावे. तसेच आठ दिवस गुरांची सेवा करण्यासाठी नगरपंचायतीने व्यवस्था करावी, असे मत नगरसेवक नितीन बांदेकर यांनी मांडले. जे गुरे मालक नोटीस देऊनही ऐकत नसतील, तर नगरपंचायतीने त्यांना कोणत्याही प्रकारचे दाखले देऊ नयेत. आपणही त्यांना कोणते सहकार्य करू नये, अशी सूचना व्ही. सी. खडपकर यांनी केली. मुख्याधिकारी कांबळे यांनी गुरे मालकांना नियमाप्रमाणे नोटीस देऊन कारवाई केली जाईल, असे सांगितले.