सिंधुदुर्ग : खाणीतून उडालेले दगड पडले बागायतीत

सोनुर्ली गावातील घटना; बागायतदार व शेतकरी बालंबाल बचावले
Sindhudurg News
सोनुर्ली दगड खाणीत क्षमतेपेक्षा मोठ्या स्फोटामुळे आजुबाजूच्या शेतात विखुरलेले दगड.
Published on
Updated on

सावंतवाडी : सोनुर्ली येथील एका दगड खाणीमध्ये क्षमतेपेक्षा मोठे ब्लास्टिंग (स्फोट) केल्याने खळबळ उडाली आहे. स्फोटामुळे उडालेले मोठे दगड नजीकच्या शेती आणि काजू बागायतीमध्ये जाऊन पडले. सुदैवाने, शेतात काम करणारे शेतकरी व कामगार थोडक्यात बचावले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली, वेत्ये आणि इन्सुली गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दगड खाणी आणि क्रशर कार्यरत आहेत. उपसरपंच गावकर यांनी आरोप केला की, महसूल विभागाच्या आशीर्वादाने नियमांचे उल्लंघन करून या खाणी सुरू आहेत. ग्रामस्थांनी वारंवार याकडे महसूल विभागाचे लक्ष वेधले, तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही. खनिकर्म विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून या गंभीर प्रकारामुळे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप उपसरपंच गावकर यांनी केला.

मंगळवारी दुपारी सोनुर्लीतील दगड खाणीत मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात आले. या स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर हादरला आणि उडालेले दगड जवळपासच्या काजू बागायती आणि शेतात पडले. सध्या काजूचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी दिवसभर बागायतीमध्ये काम करत असतात. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांच्या अगदी जवळ हे दगड पडले, मात्र केवळ सुदैवाने दुर्घटना टळली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या उपसरपंच भरत गावकर यांनी महसूल विभागाने दगड खाण मालकांच्या मनमानी कारभाराकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित खाण मालकावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा शेतकरी आणि बागायतदारांना एकत्र करून आंदोलनासारखे कठोर पाऊल उचलावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे सोनुर्ली आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, प्रशासनाने तातडीने योग्य कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे, खाणीतून उडणार्‍या धुळीमुळे काजू बागायतींवर थर साचून बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय, पावसाळ्यात खाणीतील शेती नापीक करणारी माती वाहून शेतकर्‍यांच्या शेतजमिनीमध्ये जात असल्याने जमीन नापीक बनत आहे. या नुकसानीकडे खाण आणि क्रशर मालक पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणार

याबाबत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, सोनुर्ली येथील दगड खाणीवर झालेल्या प्रकाराची आणि घटनेची माहिती मंडल अधिकार्‍यांमार्फत तात्काळ घेण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर निश्चित कारवाईची पाऊले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news