

कुडाळ : कोकणातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने पुढाकार घेऊन भरीव निधीची तरतूद करावी. नद्या गाळमुक्त करण्यासाठी कोकणाला विशेष पॅकेज द्यावे. यासह कोकणच्या विविध विकासात्मक प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधत भरीव निधीची मागणी आ. नीलेश राणे यांनी केली.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. या अधिवेशनात बुधवारी राज्यपाल यांचे अभिभाषण झाल्यानंतर आ. नीलेश राणे सभागृहात कोकणाचे विकासात्मक प्रश्न मांडले. कोकणात सरसरी चार हजार मिलीमीटर पावसाची नोंद होते. सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. या ठिकाणच्या नद्या गाळाने भरल्याने पावसाळ्यात पुराची समस्या निर्माण होते. या नद्यांमधील गाळ काढण्याची काळाची गरज आहे. अन्यथा गाळाचा प्रश्न गंभीर बनेल, याकडे आ. राणे यांनी सरकारचे लक्ष वेधताना चिपळूण व राजापूरमधील पुराची उदाहरणे देत, कोकणातील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी सरकारने कोकणासाठी विशेष पॅकेज द्यावे, बजेटमध्ये भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कुडाळ एमआयडीसीतील आजारी उद्योग सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करावा. काही भूखंडावर निवासी घरे बांधण्यात आली आहेत. याबाबत कार्यवाही व्हावी, जिल्ह्यात मालवणसह अन्य भागात पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटन वाढत आहे. शहरांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त या ठिकाणी येणार्या पर्यटकांची संख्या आहे. परंतु कोकणाला नगरोत्थानमधून मिळणारा निधी हा नगण्य आहे. शहरांचा पर्यटनात्मक विकास करण्यासाठी प्रत्येक नगरपालिकांना किमान 25 कोटीचा निधी मिळवा. तशी तरतूद सरकारने करावी, अशी मागणी आ. राणे यांनी केली. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला, देवगडमधील विजयदुर्ग किल्ला यांसह कोकणातील गड किल्ल्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे.