

कुडाळ : अदानी गो बॅक, फडणवीस सरकारचा निषेध असो, स्मार्ट मीटर रद्द झालेच पाहिजेत, कृषी पंपाला वीज मिळालीच पाहिजे, महावितरणचे खासगीकरण रद्द झालेच पाहिजे, असे हातात फलक घेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर विरोधात जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी कुडाळ महिला रुग्णालय ते महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाची दखल घेत पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील स्मार्ट मीटरचे काम बंद राहील, असे लेखी पत्र महावितरण विभागाकडून मोर्चेकरांच्या हाती सुपूर्द केले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यामुळे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांच्याकडे निवेदन देऊन स्मार्ट मीटर विरोधातील आपली लढाई सुरू राहणार असल्याची भूमिका माजी आ. वैभव नाईक व संपत देसाई यांनी मांडली.
स्मार्ट मीटर विरोधात कुडाळ येथील महिला हॉस्पिटलसमोर मोर्चासाठी वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संपत देसाई, माजी आ. वैभव नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, बाबुराव धुरी, सुनील शिंत्रे, संदेश पारकर आदींसह प्रमुख मंडळी व वीज ग्राहक एकत्रित झाले.
वैभव नाईक म्हणाले, अदानीच्या माणसांना महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात बसण्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. त्यामुळे हा सर्वांना धोक्याचा इशारा आहे. महावितरणची सर्व यंत्रणा अदानीच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. अदानीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मीटरसाठी 1 हजार रुपयाचा फटका बसणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हिंदूबाबत बोलत आहेत. तर मग आपले हे वीज ग्राहक हिंदू नाहीत का ? हे जनतेचे प्रश्न आहेत, संपत देसाई तुम्ही हा प्रश्न हाती घेतला हे चांगले झाले, आम्ही घेतलं असतं तर त्याला राजकीय किनार लागली असती. आता सर्वानी एकजुटीने विरोध करुया, असे आवाहन नाईक यांनी केले.
संपत देसाई म्हणाले , स्मार्ट मीटर हे सामान्य ग्राहकाला बसवले जाणार नाहीत असे तत्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी सांगितले होते. पण प्रत्यक्षात आता वस्तुस्थिती वेगळी आहे. कोल्हापूर किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अदानीने आपली स्वतंत्र यंत्रणा उभी केलेली आहे, त्याच्या विरोधात आजचा हा एल्गार आहे, हे सरकार अदानी चालवतो. यांना निवडून येण्यासाठी अदानीने भरमसाठ पैसा दिला आहे. अदानी जे सांगेल ते हे सरकार करत आहे. केंद्र किंवा राज्य हे दोन्ही सरकारी अदानीच चालवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काहीच सुरक्षित नाही. एकेक करत सर्व संस्था अदानीच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. या गुलामांना धडा शिकविल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
अमित सामंत म्हणाले, आताच झालेल्या निवडणुका या गैरमार्गाने जिंकल्या गेल्या, चुकीची आश्वासने देऊन जिंकल्या गेल्या. आता अदानीच्या घशात महावितरण कंपनी घालण्याचा डाव सुरू आहे, सर्वसामान्य जनतेसाठी हा फार मोठा धोका आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरविरोधात सर्वांनी एकजुटीने लढणे आवश्यक आहे. अदानी आणि अंबानीच्या घशात आपला महाराष्ट्र जाऊ न देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सामंत यांनी सांगितले.
इर्शाद शेख म्हणाले, आपला ग्राहक चांगल्या पद्धतीने वीज बिल भरणा करतो तर मग अशा प्रकारचे स्मार्ट मीटर बसवण्याचे कारण काय? स्मार्ट मीटरची ही यंत्रणा अदानीला देण्यात आलेली आहे. आता या मीटरमध्ये रिचार्ज संपले की लाईट बंद होणार आहे; म्हणजेच एक प्रकारची जनतेची लूट मोठ्या प्रमाणात होणार आहे.ही लढाई नेत्यांची किंवा कुठल्या पक्षाची नाही तर प्रत्येक वीज ग्राहकाची आहे. अदानीचा करार रद्द होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार आहे असे इर्शाद शेख यांनी सांगितले. संदेश पारकर, सुनील शित्रे, मंगेश तळवणेकर यांनीही विचार व्यक्त केले.
सर्व प्रमुख मंडळी कुडाळ महिला रुग्णालय ते महावितरण अधीक्षक कार्यालयापर्यंत हातात फलक देत घोषणाबाजी करत मार्गक्रमण केले. यावेळी अधिकार्यांशी प्रमुख मंडळींनी संवाद साधला. माजी आ. वैभव नाईक यांनी अधीक्षक अभियंता उपस्थित न राहिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित राहिलेले कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांना आंदोलकांनी धारेवर धरले. आंदोलनाची तीव्रता पाहून वनमोरे यांनी काही वेळातच आंदोलकांना सिंधुदुर्गात सुरू असलेले स्मार्ट मीटरचे काम पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात येईल, असे लेखी पत्र दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
अभय शिरसाट, विद्याप्रसाद बांदेकर, मंदार शिरसाट, अमरसेन सावंत, विजय प्रभू, संतोष शिरसाट, शिवाजी घोगळे, सौ.श्रेया परब, मंगेश तळवणेकर, सौ.अक्षता खटावकर, गंगाराम सडवेलकर, अतुल बंगे, श्रेया गवंडे, सचिन काळप, उदय कुडाळकर, मथुरा राऊळ, अनघा तेंडोलकर आदींसह मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक उपस्थित होते.
सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत. महावितरणचे जे कर्मचारी आहेत, त्यांची जी घरे आहेत त्याच ठिकाणी पहिल्यांदा हे स्मार्ट मीटर लावायचे ठरले आहे. तसेच सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत, असे तत्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले होते, याबाबतचा ऑडीओ महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर स्पीकरवरुन लावण्यात आला.