Student School Issue | शाळा एक... शिक्षक एक... मूल एक!

अशा 36 शाळांना ‘शाळा’ कशी म्हणावी? वर्षाकाठी एका मुलावर 10 लाख खर्च
Student School Issue
शाळेत अशा शाळकरी मुलांच्या गर्दीत शिक्षण घेणं खूपच आनंददायी असतं... हा आनंद प्रत्येक शाळकरी मुलाला मिळायला हवा.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

गणेश जेठे

आश्चर्याने तोंडात बोटे जावीत अशी स्थिती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 36 शाळांची आहे. अख्ख्या शाळेत केवळ एक मूल! एक शिक्षक! ज्या शाळेत केवळ एकच मूल त्याला शाळा कशी म्हणावी? इमारतीत नव्हे अगदी झाडाखाली अनेक मुले एकत्र जमली तरी ती शाळा. याचाच अर्थ शिकण्यासाठी मुले एकत्र येतात, ती शाळा. केवळ इमारतीच्या भिंती, कंपाऊंड वॉल आणि मोठे मोठाले फळे म्हणजे शाळा नाही. जिल्ह्यातील 36 शाळांमध्ये केवळ एकच मूल आहे. अशा शाळा बंद व्हायला हव्यात की नको? बहुसंख्य शिक्षण प्रेमींचे म्हणणे आहे या शाळा बंद व्हायला हव्यात. इतर ठिकाणी मोठ्या संख्येने मुले असलेल्या शाळांमध्ये या 36 शाळांमधील मुलांना शिक्षण द्यायला हवे!

खरेतर एकच मूल असलेल्या शाळेमध्ये सर्वात जास्त शैक्षणिक अन्याय म्हणता येईल, तो अन्याय होतोय त्या शाळेत शिकणार्‍या मुलावर. शिक्षण तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की मूल जेव्हा शाळेत जाते तेव्हा ते अर्धे शिक्षण शिक्षकांकडून पुस्तकातून घेते आणि अर्धे शिक्षण शाळा परिसर, शिक्षक आणि इतर मुलांकडून घेते. शाळेत शिकणार्‍या मुलांचा समूह खुप काही शिकवत असतो. इतर मुलांशी हसत, खेळत, बागडत मुले मोठी होत असतात. एकच मूल असलेल्या शाळेत हे सर्व शक्य आहे का? असा प्रश्न आहे.

Student School Issue
Sindhudurg Crime News | मोरेतील अनधिकृत बंदूक कारखान्यात बंदुका विक्री प्रकरणी त्या पाच जणांना पोलीस कोठडी!

ग्रामस्थांनी 50-100 वर्षापूर्वी पायली फंड गोळा करून, श्रमदान करून शाळा उभारल्या हे खरे आहे, परंतु त्या काळात मुले मोठ्या संख्येने होती. आता खेड्यातला माणूस शहराकडे चाललाय. शेतीपूरक जीवन शैली सोडून तो शहरातल्या झगमगटाकडे आकर्षित होतोय. परिणामस्वरूप गावातल्या शाळांमधील मुलांची संख्या वेगाने घटते आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा पटसंख्या शुन्यावर आल्याने बंद पडल्यात. तर मग 1 मूल असलेली शाळा किती वर्षे टिकणार, ती बंदच पडणार आहे. हे जर खरे आहे तर सध्या एकच असलेल्या मुलावर अन्याय का? त्यालाही मुलांमुळे गजबजलेल्या शाळेतील शिक्षणाचा आनंद का नको?

आता एका शिक्षकाचा महिन्याचा पगार साधारणत: 70 ते 80 हजार रू.पर्यंत आहे. म्हणजे वर्षाला 9 लाखाच्या आसपास. त्याशिवाय पोषण आहार शिजवणार्‍या ताईला 4 हजार. म्हणजेच वर्षाकाठी एका मुलाच्या शिक्षणासाठी खर्च होतोय 10 लाखाचा. हेच मूल जर गावातील दुसर्‍या मोठ्या शाळेत टाकले तर त्याला किती खर्च येईल? खुपच कमी. एका बाजुने एकाच मुलाला ना शाळेचा आनंद, ना परिसर शिक्षण, ना इतर मुलांचे अनुकरण, ना इतर मुलांच्या सहवासाचा आनंद आणि दुसर्‍या बाजुने शासनाचा वाढता खर्च, हे लक्षात घेता अशी शाळा बंद करणे योग्यच. कारण यापुढे अशा शाळांमध्ये मुलांची संख्या वाढून वाढून किती वाढणार? दोन-चार मुले वाढतील, परंतु तेवढ्याने काय होणार? सध्याची गावांमधील स्थिती पाहता मुलांची संख्या पुरेशी वाढणे कठीण आहे. या परिस्थितीत अशा शाळा बंद केलेल्याच बर्‍या असं मत बनत चाललय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 36 शाळांपैकी अशी एक शाळा आहे की तेथील माहिती विशिष्ट आहे. जे एक मूल आहे त्याचे पालकच शिक्षक आहेत. तेही त्याच शाळेत. ते मूल त्या शिक्षकासोबत शाळेत येते, दिवसभर दोघेच शाळेत असतात, पुन्हा घरी दोघे जातात. घरी आणि शाळेत दोघेच. यातून त्या मुलाचे शिक्षण योग्य प्रकारे होईल का? त्याला इतर मुले, शिक्षक यांच्या सहवासाचा आनंद मिळेल का? शाळा टिकवण्याचा हा प्रयत्न असला तरी भविष्यात मुले वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यात पुन्हा शासनाला अशा शाळा बंद करण्याची वेळ येणारच आहे. तर मग असा शाळा टिकविण्याचा प्रयत्न का केला जातो हा प्रश्न आहे.

Student School Issue
Sindhudurg Crime News |आंतरराज्‍य घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत ओरोपींच्या बेंगलोर येथून मुसक्‍या आवळल्‍या

‘एक गाव एक शाळा’ हे धोरण आज ना उद्या आपल्या जिल्ह्यात राबवावे लागणार अशी सद्यस्थिती सांगते. आजच्या घडीला कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शहरांमध्ये शाळांची संख्या वाढते आहे आणि पटसंख्याही वाढते आहे. कारण गावातील लोक शहरात येवून राहत आहेत.

काही वेळा अनेक शाळांच्या स्कूलबस गावात जावून मुले शहरातील शाळांमध्ये आणत आहेत. त्यामुळे गावातल्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. म्हणूनच एका गावात एक शाळा दर्जेदारपणे उभी केली तर मुलांना चांगले वातावरण मिळेल. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल.

Student School Issue
Sindhudurg News| सिंधुदुर्ग कन्येचा गुन्हेगारी कमी करण्याचा निर्धार

एका मुलाच्या शाळांमध्ये 10 ने वाढ

गेल्यावर्षी जिल्ह्यात 1 मूल असलेल्या शाळा होत्या 26 इतक्या. यावर्षी त्या 36 इतक्या झाल्या आहेत. म्हणजेच एका वर्षात 10 ने वाढ झाली आहे. एक मूल असलेल्या सर्वात जास्त 8 इतक्या शाळा आहेत मालवण तालुक्यात. गेल्यावर्षी त्या 6 इतक्या होत्या. देवगड तालुक्यात गेल्यावर्षी एक पटसंख्या असलेल्या शाळा 4 इतक्या होत्या. यावर्षी त्यात 3 ने वाढ होवून त्या 7 इतक्या झाल्या आहेत. वेंगुर्ले तालुक्यात गेल्यावर्षी एकही शाळा एका पटसंख्येची नव्हती. यावर्षी तिथे 2 शाळा आहेत. दोडामार्गमध्ये एका पटसंख्येच्या शाळा आहेत 3 इतक्या. कणकवली तालुक्यात 6 इतक्या आहेत तर कुडाळ तालुक्यात 4 इतक्या आहेत. सावंतवाडीत अशा 3 शाळा आणि वैभववाडी तालुक्यात 3 शाळा आहेत. या शाळा बंद करणे आवश्यक असल्याचे मत अनेक शिक्षण प्रेमींनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news