

ओरोस : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी व स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ‘सिंधुरत्न समृध्द योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेतून दोन ते तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजस उभी राहणार आहेत. या प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पात्र 45 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासात स्थानिकांचा सहभाग वाढून पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे, सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष आ. दीपक केसरकर म्हणाले.
सिंधुरत्न समृध्द योजनेतून आंततरराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजस उभारणीसाठी देण्यात येणार्या कर्जवितरण कार्यक्रम अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग बँकेच्या सभागृहात पार पडला. यावेळी 45 लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले, त्यातील 4 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज मंजुरीचा धनादेशाचे वितरण करण्यात आले. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा नियेाजन अधिकारी यशवंत बुधावले, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी विशाल तनपुरे आदी उपस्थित होते.
आ. केसरकर म्हणाले, सिंधुरत्न समृध्द योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्नात वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारण्यासाठी या योजनेतून 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी ढूशि - (30 लाख रु.) ढूशि क (40लाख रु.) असे दोन प्रकारचे कॉटेजेस उभारण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांना प्रकल्पाच्या 50 टक्के अनुदान अदा केले जाणार आहे. या प्रकल्पात लाभार्थ्यांची गुंतवणूक रक्कम जास्त असल्यामुळे सिंधुदुर्ग बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. कॉटेज पूर्ण झाल्यावर ‘ताज ग्रुप’चे सहकार्य घेण्याचा प्रयत्न केल्या जाणार असल्याने लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर म्हणाले, सिंधुरत्न समृध्द योजनेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देणार्या अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. परिणामी जिल्ह्यात पर्यटनाचा वेग वाढत आहे. आंतराष्ट्रीय दर्जाचे कॉटेजस पूर्ण झाल्यावर नक्कीच पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्याच्या विकासात सिंधुदुर्ग बँकेचे मोलाचे योगदान आहे. भविष्यात जिल्हा परीषद आणि सिंधुदुर्ग बँक एकत्रितपणे अनेक योजना राबविणार असल्याचे श्री. खेबुडकर म्हणाले.
सिंधुरत्न समृध्द योजनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारण्याचा निर्णय हे जिल्ह्याच्या विकासात ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. आता आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढणार आहे असल्याने पर्यटनवाढीसह रोजगाराच्या संधीत देखील वाढ होणार आहे. पर्यटनवाढीमध्ये आता स्थानिकांचा सहभाग वाढणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 महिन्यांत 45 ठिकाणी 150 खोल्या उभारण्यात येणार असल्याने खर्या अर्थाने हा प्रकल्प पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प ठरणार आहे.
मनीष दळवी, अध्यक्ष-सिंधुदुर्ग बँक