

ओरोस ः जिल्ह्यातील वाढते अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणार्यांची संख्येत पुढील वर्षभरात घट झाली पाहिजे, या दृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाने नियमांचे काटेकोरपणे पालन करून बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करावी, असे आवाहन मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांना केले.
सिंधुदुर्गनगरी येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाच्या आयोजित प्रांगणात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सोमवारी झाले. या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सहा. परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, सार्व. बांधकाम विभागा कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आदींसह मोटार परिवहन विभाग, पोलीस व एसटीचे अधिकारी तसेच रिक्षा संघटना व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी परिवहन विगाच्या दिनदशिकेचे प्रकाशन ना. राणे यांच्या हस्ते करण्यात आले. विना अपघात वाहतूक करणारे एसटी चालक, रिक्षा चालक यांना सन्मानित करण्यात आले. गौरी बांदेकर ग्रुपच्या वतीने यावेळी रस्ता सुरक्षा पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्य ग्रुपला मंत्री नितेश राणे यांनी सन्मानित केले.
सूत्रसंचालन अविनाश वालावलकर यांनी केले. प्रास्ताविकात आरटीओ विजय काळे यांनी जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी दिली. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 220 रस्ता अपघात झाले. आरटीओ विभागामार्फत अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हा सप्ताह कार्यक्रम राबविला जात आहे.
ना. राणे म्हणाले, रस्ता सुरक्षा मोहीम सप्ताहापुरती न रहाता ती सातत्याने कटाक्षाने व नियमाला धरून राबवली पाहिजे. जेणेकरून पुढील वर्षभरात जिल्ह्यातील रस्ते अपघातांचा आलेख घटलेला असेल. ओसरगाव टोल नाका सुरू नसताना तेथे बेकायदेशीर टोल आकारणी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत परिवहन विभाग आणि पोलीसांनी गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करताना त्याचा त्रास नियम पाळणारे पर्यटक व अन्य वाहन चालकांना होणार नाही, याचीही काळजी घ्या, अशी सूचना त्यांनी आरटीओ व पोलिस अधिकार्यांना केली.
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे प्रमाणेच मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी अॅम्बुलन्स सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असे, ना. राणे म्हणाले. जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले.