

देवगड : देवगड तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीशी थेट जोडणाऱ्या प्रस्तावित रस्त्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी या रस्त्याला प्रमुख राज्य मार्गाचा दर्जा देऊन रस्ते विकास आराखड्यात समावेश करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या रस्ते विकास आराखड्यात हा मार्ग नकाशावर प्रस्तावित करण्यात आला आहे.
सध्या देवगड ते सिंधुदुर्गनगरी जाण्यासाठी नांदगाव मार्गे ८६ किमीचा प्रवास वळणावळणाच्या रस्त्याने करावा लागतो. यासाठी किमान दोन तास वेळ लागतो. मात्र, हा नवा मार्ग ५४ किमीचा असणार असून देवगड येथून केवळ एका तासात सिंधुदुर्गनगरी मुख्यालय येथे पोचता येणार आहे.
देवगड तालुका हा हापूस आंब्याच्या उत्पादनासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही या तालुक्याला मोठे महत्त्व आहे. ऐतिहासिक वारसा, किनारपट्टीवरील पर्यटनस्थळे आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी सक्षम रस्ते संपर्क आवश्यक आहे. सिंधुदुर्गनगरी-देवगड थेट मार्ग विकसित झाल्यास तालुक्यातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचणे सोयीचे होण्याबरोबरच पर्यटन, व्यापार आणि स्थानिक आर्थिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.