Sindhudurg ZP Election : शिवसेनेकडून संजय पडते, दीपलक्ष्मी पडते यांना उमेदवारी जाहीर

चौथ्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज दाखल; आज शेवटच्या दिवशी गर्दी उसळणार
Sindhudurg ZP Election
आ. नीलेश राणे हे उमेदवारांना एबी फॉर्म देताना.
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेमुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले असले, तरी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मात्र इच्छुक उमेदवारांनी अत्यंत सावध भूमिका घेतल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. चौथ्या दिवशीही किंवा दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, तर बहुतांश उमेदवारांनी ‌‘वेट अँड वॉच‌’ची रणनीती स्वीकारत राजकीय घडामोडींचा अंदाज घेणे पसंत केले. त्यामुळे प्रशासन सज्ज असतानाही तहसील कार्यालयात दिवसभर प्रतीक्षेचे वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करत राजकीय मैदानात जोरदार एन्ट्री घेतली आहे. आ. निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा परिषद गटांसाठी आंब्रड येथून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते, वेताळबांबर्डेतून नागेश आईर, पावशीतून दादा साईल, घावनळेतून दीपक नारकर, नेरूर देऊळवाड्यातून माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, तर माणगाव गटासाठी रूपेश कानडे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.

पंचायत समिती गटांमध्ये माणगाव कौशल जोशी, गोठोस दिव्यानी खरात, वेताळबांबर्डे अश्विनी सावंत, डिगस निखील कांदळगावकर, जांभवडे बाळू मडव, कसाल बापू पाताडे, नेरूर देवूळवाडा निता नाईक, पाट प्रियांका जळवी व साळगाव मिलिंद नाईक यांची नावे निश्चित झाल्याचे समजते. एबी फॉर्मच्या वाटपामुळे शिंदे शिवसेनेची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, बुधवार रोजी सर्व उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील निवडणूक रणधुमाळी आता अधिकच तापणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

कुडाळ तालुक्यातील 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती मतदारसंघांसाठी आतापर्यंत एकूण 224 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. मात्र, या आकड्यांच्या तुलनेत प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात एकही अर्ज दाखल न झाल्याने प्रशासनालाही काही काळ प्रतीक्षेत राहावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त पूर्णतः सज्ज असतानाही उमेदवारांच्या अनुपस्थितीने वातावरण काहीसे शांत होते. दुपारनंतर मात्र राजकीय हालचालींना सुरुवात झाली. डिगस गावचे रहिवासी असलेले अपक्ष उमेदवार भानुदास सूर्यकांत रावराणे यांनी पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत कुडाळ तालुक्यातील पहिला अर्ज सादर केला. त्यांच्या अर्ज दाखल करण्याने निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.

त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून घावनळे येथील सखाराम उर्फ पांडू चंद्रकांत खोचरे यांनी घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.दरम्यान, मंगळवारी चौथ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी 28 तर पंचायत समितीसाठी 38 उमेदवारी अर्जांची विक्री झाली. बुधवार 21 जानेवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने मंगळवारपासून अर्ज भरण्यासाठी गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तशी गर्दी दिसून आली नाही. तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसत होती; मात्र अर्ज भरण्याऐवजी बहुतांश उमेदवारांनी अर्ज तपासून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बाबी समजून घेणे यावर भर दिला.या काळात भाजपा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिंदे गटाची शिवसेना, तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, अनेक उमेदवारांना अद्याप पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळालेला नसल्याने त्यांनी अर्ज दाखल न करता प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे, अनेक इच्छुक उमेदवारांनी संभाव्य राजकीय घडामोडी लक्षात घेऊन स्वतःसाठी दोन उमेदवारी अर्जांची खरेदी केली आहे. एक अर्ज पक्षाच्या उमेदवारीसाठी, तर दुसरा अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी. पक्षांतर्गत जागावाटपाचे सूत्र निश्चित झाल्यानंतर अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाल्याची नाराजी उघडपणे दिसून येत आहे. काही ठिकाणी नाराजीचे सूर दबक्या आवाजात उमटत असून, त्यातूनच काही इच्छुकांनी दुसऱ्या पक्षातून किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.या सगळ्या घडामोडींमुळे कुडाळच्या राजकारणात अंतर्गत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. बाहेरून शांतता भासवत असली, तरी आतून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशीच ‌‘वेट अँड वॉच‌’ची भूमिका घेत शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय राखून ठेवला आहे.

उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कक्ष पूर्णतः सज्ज असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असली, तरी उमेदवारांच्या रणनीतीमुळे अंतिम दिवशीच खरी धामधूम पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, बुधवार 21 जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बुधवारी कुडाळ तहसील कार्यालयात उमेदवारांची झुंबड उडण्याची दाट शक्यता असल्यामुळे प्रशासनाने त्यादृष्टिने तयारी ठेवली आहे, कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा खरा रंग अंतिम दिवशीच उलगडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news