Sindhudurg ZP Election Result : सिंधुदुर्गात महायुतीची सत्ता; अपक्षांचा धमाका

जि.प.निवडणुकीत भाजपला 27, शिवसेनेला 13 जागा; सर्व पंचायत समित्यांवरही सत्ता
Sindhudurg ZP Election
सिंधुदुर्गात महायुतीची सत्ता; अपक्षांचा धमाकाpudhari photo
Published on
Updated on

गणेश जेठे

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेच्या एकुण 50 जागांपैकी तब्बल 27 जागा जिंकत भाजपचे नेते पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने तब्बल 14 जागा जिंकल्या असुन महायुतीची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर निर्विवाद सत्ता आली आहे. ठाकरे शिवसेनेला एखादी जागा मिळेल अशी शक्यता वर्तविली जात असताना ठाकरे शिवसेनेने 3 जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत अपक्षांनी तब्बल 6 जागा जिंकत धमाका केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात अपक्षांनी प्रथमच इतक्या जागा जिंकल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व आठही पंचायत समित्यांवर महायुतीने सत्ता प्रस्थापित केली असून पालकमंत्री नितेश राणे यांच्या विधानसभा मतदारसंघातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी या ठिकाणी भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला जेव्हा सुरूवात झाली तेव्हा जिथे भाजपचे बंडखोर उमेदवार उभे राहिले होते, त्या जिल्हा परिषद प्रभागांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात फारसा मेळ नव्हता. त्यामुळे ही निवडणूक तशी एकतर्फी वाटत होती. प्रचाराला दिवस कमी होते आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या 150 जागांपैकी तब्बल 25 जागा बिनविरोध झाल्या होत्या. अर्थात यातील 23 जागा भाजपच्या आणि 2 शिवसेनेच्या जागांचा समावेश आहे. परिणामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीच सत्तेवर येणार असे वातावरण होते. केवळ बंडखोर उमेदवारांचे काय होणार याची उत्सुकता ताणली गेली होती.

सकाळी 10.45 वा.च्या सुमारास कणकवलीमध्ये शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराचा पंचायत समितीमध्ये विजय झाला ही पहिली बातमी बाहेर पडली, मग माडखोल आणि नंतर कोलगावमध्ये अपक्षांनी बाजी मारल्याची बातमी पसरली. संपूर्ण निकालादरम्यान भाजपचे उमेदवार विजयी होत असल्याबद्दल आनंदोत्सव साजरा होत असतानाच बंडखोरांच्या विजयामुळे भाजप आणि शिवसेनेला धक्केही बसत होते. मात्र याही परिस्थितीत भाजपने तब्बल 27 जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. शिवसेनेनेही 14 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे युतीचे संख्याबळ 41 इतके झाले असून अपक्ष म्हणून निवडून आलेले 6 उमेदवार हे पूर्वी भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्यावर भाजपने निलंबनाची कारवाई केली होती. त्यातील निवडून आलेल्या 6 उमेदवारांमध्ये फोंडाघाटमधील राजन चिके, कोलगावमधील मायकल डिसोजा, तुळसमधील सुजाता पडवळ, इन्सुलीमधील नितीन राऊळ, माडखोलमधील शिवानी नाईक आणि नेरूर प्रभागातील रूपेश पावसकर यांचा समावेश आहे.

आता हे 6 अपक्ष विजयी उमेदवार कोणाला साथ देतात आणि त्यांच्याबाबत भाजपची काय भुमिका आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे. अर्थात हे सहाही उमेदवार भाजपसोबत जाण्याची शक्यता असून भाजप आणि शिवसेना महायुतीचे एकुण संख्याबळ 47 इतकी होईल अशी स्थिती आहे. पंचायत समित्यांमध्ये महायुतीचीच सत्ता आली आहे. कणकवली पंचायत समितीमध्ये एकूण 16 जागांपैकी 14 जागा भाजपच्या निवडून आल्या असून 2 जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे. कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विरोधी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 7 जागा भाजपने जिंकल्या असून फोंडाघाटमध्ये भाजपचे अपक्ष बंडखोर उमेदवार राजन चिके यांनी ही जागा जिंकली आहे.

देवगड पंचायत समितीमध्ये भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या असून शिवसेनेने 2 जागा जिंकल्या आहेत. या तालुक्यात ठाकरे शिवसेनेनेही पंचायत समितीच्या एका जागेवर विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व सातही जागा भाजपने जिंकल्या आहेत. वैभववाडी तालुक्यातही पंचायत समितीवर भाजपने एक हाती वर्चस्व मिळवले आहे. सर्व 6 जागांवर भाजप विजयी झाला आहे. या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीनही जागा भाजपने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे वैभववाडी तालुक्यात विरोधी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषदेमध्ये आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 5 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपला तिथे 2 जागांवर विजय मिळाला असून ठाकरे शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. विशेष म्हणजे नेरूर प्रभागातील अपक्ष उमेदवार रूपेश पावसकर यांनी विजय मिळवला आहे. भाजपने त्यांच्यावर बंडखोरी केल्यामुळे निलंबनाची कारवाई केली आहे. कुडाळ पंचायत समितीमध्ये सर्वात जास्त भाजपचे 7 सदस्य विजयी झाले असून शिवसेनेला 6 जागा मिळाल्या आहेत. कुडाळ तालुक्यात मात्र माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेने पंचायत समितीच्या तब्बल 5 जागा जिंकल्या आहेत.

मालवण तालुक्यात पंचायत समितीमध्ये भाजपच्या 6 आणि शिवसेनेच्या 6 उमेदवारांनी विजय मिळवला असून विरोधी पक्षाला या तालुक्यात एकाही पंचायत समिती प्रभागावर वर्चस्व मिळवता आलेले नाही. या तालुक्यात शिवसेनेने 5 जागा जिंकल्या असून भाजपने एक जागांवर विजय मिळवला आहे. दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 3 जागांपैकी 2 जागा भाजपने जिंकल्या आहेत. एका जागेवर आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विजय मिळवला आहे. दोडामार्ग तालुक्यात भाजपचे 3 आणि शिवसेनेचे 3 उमेदवार पंचायत समितीवर विजयी झाले आहेत. वेंगुर्ले तालुक्यात मात्र पंचायत समितीवर 10 जागांपैकी 5 जागा भाजपने जिंकल्या असून 3 जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. पंचायत समितीच्या 2 जागांवर अपक्षांनी विजय मिळवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news