

ओरोस ः सिंधुदुर्ग जि.प., पं.स. निवडणुकीसाठी शनिवारी सुमारे सरासरी 60.11 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वच भागांत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. जिल्हा परिषदेच्या 42 मतदारसंघांतील 115 आणि पंचायत समितीच्या 83 मतदारसंघांतील 244 उमेदवारांचे भवितव्य सायंकाळी साडेपाच वाजता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये बंद झाले. सोमवार, 9 फेबु्रवारी रोजी मतमोजणी असून या निवडणुकीत कोण कोण विजयाचा गुलाल उधळणार आणि सिंधुदुर्ग जि.प.वर कोणाची सत्ता येणार, हे स्पष्ट होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानास शनिवारी सकाळी 7.30 पासून सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात काही प्रमाणात केंद्रांवर गर्दी होती. जिल्ह्यातील 810 मतदान केंद्रांवर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. पहिल्या टप्प्यात 7.30 ते 9.30 या वेळेत वैभववाडी-कणकवली आणि देवगड या विधानसभा मतदारसंघांत चांगला प्रतिसाद दिसत होता. वैभववाडी तालुक्यात 11.39 टक्के, कणकवली 11.18 टक्के, देवगड 11.59 टक्के, मालवण 9.29 टक्के, कुडाळ 10.67 टक्के, वेंगुर्ले 9.98 टक्के, सावंतवाडी 11. 11 टक्के, दोडामार्ग 9.94 टक्के असे एकूण 10.64 टक्के मतदान पहिल्या टप्प्यात झाले. पहिल्या टप्प्यात सर्वात कमी मतदान मालवण तालुक्यात 9.29 टक्के झाले होते. दुसऱ्या टप्प्यात सकाळी 7.30 ते 11.30 यावेळेत जिल्ह्यात 25.72 टक्के मतदान झाले.
यामध्ये वैभववाडी तालुका 29.56 टक्के, कणकवली तालुका 27.61 टक्के, देवगड तालुका 28.02 टक्के, मालवण तालुका 23.63 टक्के, कुडाळ तालुका 24.35 टक्के, वेंगुर्ले तालुका 24.61 टक्के, सावंतवाडी तालुका 26.56 टक्के, तर दोडामार्ग तालुक्यात 22.92 टक्के एवढे मतदान झाले. दुपारी 1.30 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 40.13 टक्क्यांपर्यंत पोहोचली. यामध्ये वैभववाडी तालुका 43.20 टक्के, कणकवली तालुका 41.98 टक्के, देवगड तालुका 41.74 टक्के, मालवण तालुका 37.612 टक्के, कुडाळ तालुका 37.72 टक्के, वेंगुर्ले तालुका 39.84 टक्के, सावंतवाडी तालुका 42.88 टक्के, तर दोडामार्ग तालुक्यात 36.53 टक्के इतके मतदान झाले.
दुपारी 3.30 वाजेपर्यंत 50.10 टक्के इतके सरासरी मतदान झाले होते. त्यामध्ये वैभववाडी तालुका 49.17 टक्के, कणकवली तालुका 50.70 टक्के, देवगड तालुका 49.45 टक्के, मालवण तालुका 47.30 टक्के, कुडाळ तालुका 47.45 टक्के, वेंगुर्ले तालुका 53.03 टक्के, सावंतवाडी तालुका 55.38 टक्के आणि दोडामार्ग तालुका 45.24 टक्के इतके मतदान झाले. जिल्ह्यात सायंकाळी 5.30 पर्यंत सरासरी सुमारे 60.11 टक्के इतके अंदाजित मतदान झाले. अंतिम आकडेवारीचे संकलन प्रशासनाकडून उशिरापर्यंत सुरु होते. एकूणच जि.प.निवडणूकांचा रणसंग्राम संपला असून आता उत्सुकता सोमवारी होणाऱ्या निकालाकडे आहे. जिल्ह्यात भाजप, शिवसेना महायुती विरुध्द ठाकरे शिवसेना यांच्यात प्रमुख लढत झाली होती. तर मतदारसंघात अपक्षांनी चुरस निर्माण केली होती. त्यामुळे सोमवारच्या मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.