

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा केवळ फार्स ठरली असून, सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम केले आहे. जिल्हा परिषदेतील अनेक खाती भ्रष्टाचाराने माखलेली असून, मागील अनेक वर्षांपासून एकाच खुर्चीला चिटकून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे, असा घणाघाती आरोप जि. प. च्सा. विरोधी सदस्यांनी केला. कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे शुक्रवारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत रुपेश पावसकर, गंगाराम सडवेलकर, संजय गावडे आणि विजय नाईक या चार विरोधी सदस्यांनी प्रशासकीय अनागोंदीचे वाभाडे काढले. आरोग्य विभागाचा 'सांगाडा'; गरिबांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार रुपेश पावसकर यांनी आरोग्य विभागातील विदारक स्थिती मांडली. ते म्हणाले, कुडाळ उपजिल्हा रुग्णालय स्वतःच व्हेंटिलेटरवर आहे. तिथे तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, शवविच्छेदनासाठी आवश्यक 'कटर' सुद्धा नाही. हे कटर आणण्यासाठी गरीबांना किंवा पोलिसांना पदरचे २ ते ३ हजार रुपये मोजावे लागतात, ही शरमेची बाब आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डीनचा मनमानी कारभार सुरू आहे. गेल्या ८ महिन्यांपासून तेथील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. कंत्राटी वाहनचालकांकडून १० हजारांचे कोरे धनादेश आगाऊ घेऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन निधीचे समान वाटप व्हावे, मनमानी खपवून घेणार नाही असे श्री. पावसकर यांनी सांगितले. पिंगुळी पाझर तलाव वाचवण्यासाठी १ मे ला 'कलेक्टर ऑफिस'वर धडक जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी पिंगुळी येथील पाझर तलावावर होत असलेल्या अतिक्रमणावर भाष्य केले. एका खाजगी कंपनीच्या बांधकामामुळे १५ ते २० हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत असणारा हा तलाव दूषित होणार आहे. ग्रामपंचायतीने दिलेली एनओसी बेकायदेशीर असून लघु पाटबंधारे विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. याबाबत आपण १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जलजीवन मिशनचा फोलपणा आणि शाळांची दुरवस्था विजय नाईक यांनी जलजीवन मिशनमधील त्रुटींवर बोट ठेवले. घरोघरी नळ आले, पण त्यात पाणीच नाही. ठेकेदारांची ४५० कोटींची बिले थकल्यामुळे कामे बंद पडली आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यातील २५० शाळांवर कोट्यवधींचा खर्च झाला असताना तिथे विद्यार्थीच नाहीत, तर दुसरीकडे शालेय पोषण आहारात मुले न खाणारे पदार्थ देऊन सरकारी पैशाचा अपव्यय केला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
५० सदस्यांचे माईक बंद, एसी फक्त अधिकाऱ्यांसाठीच?
संजय गावडे यांनी सभागृहातील अनुभवावर संताप व्यक्त केला. चार वर्षांनंतर सभा होत असताना सदस्यांना बोलू न देताच सभा गुंडाळली गेली. अधिकाऱ्यांची दालने एसीमध्ये थंड आहेत, पण ज्या सभागृहात लोकप्रतिनिधी बसतात तिथे पंखे नाहीत, व्हेंटिलेशन नाही आणि माईक सुद्धा बंद ठेवले जातात. हा लोकशाहीचा अपमान आहे. समुद्र किनारपट्टीवर पर्यटन वाढवण्यासाठी अंडर-ग्राउंड केबलची गरज असताना काही लोकप्रतिनिधी त्याला विरोध करून जिल्ह्याचे नुकसान करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.