Sindhudurg News : घरगुती ८०० रु. तर व्‍यावसायिक पाणीपट्टीत १५०० रु. वाढ

महिला विकास भवन, सायन्‍स पार्क, कोंडवाडासह विविध विषयांवर चर्चा
Water Tax Hike
घरगुती ८०० रु. तर व्‍यावसायिक पाणीपट्टीत १५०० रु. वाढ
Published on
Updated on

कणकवली : कणकवली नगरपंचायत सर्वसाधारण सभेत शहरातील नळ योजनेच्‍या पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या घरगुती नळ कनेक्‍शन वार्षिक कर रक्‍कम ८०६ रु. तर बिगर घरगुती नळ कनेक्‍शन वार्षिक कर रक्‍कम ३५८० रु. आकारण्यात येते. मात्र पाणीपुरवठ्यावर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत उत्‍पन्‍न तुटपुंजे असल्‍याने व इतर कोणताही उत्‍पन्‍नाचा स्‍त्रोत उपलब्ध नसल्‍याने चर्चेअंती पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्‍यानुसार घरगुती पाणीपट्टीत ८०० रु. तर व्‍यावसायिक पाणीपट्टीत १५०० रु.ने वाढ करण्यात आली असून ही वाढ २०२६-२७ या आर्थिक वर्षापासून लागू झाली आहे. या सभेत महिला विकास भवन, मोकाट जनावरांकरता कोंडवाडा, सायन्‍स पार्कसह विविध विषयांवर चर्चा झाली.

कणकवली न.पं.ची सर्वसाधारण सभा गुरुवारी नगरवाचनालय सभागृहात नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्‍या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, सर्व नगरसेवक, न. पं. अधिकारी, कर्मचारी उपस्‍थित होते. चौंडेश्वरी देवी मंदिराजवळील चौकास 'श्री देवी चौंडेश्वरी चौक' आणि फौजदारवाडी येथील चौकास 'वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक' असे नाव देण्याबाबत एकमताने मंजुरी देण्यात आली. अंगणवाडी क्र. ४ व ५ ची इमारत जीर्ण झाल्‍याने नवीन इमारत बांधण्यास न. पं.चे नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबत किंवा दोन्‍ही अंगणवाडी न. पं.कडे वर्ग केल्‍यास त्‍यांनी दुरुस्‍ती अथवा नव्‍याने इमारत बांधण्याबाबत चर्चा झाली. मध्यंतरी शाळांसाठी न.पं.कडे निधी आला, परंतु शाळा जि.प.च्‍या ताब्यात असल्‍याने तो निधी इतरत्र वर्ग झाला. या शाळा किंवा अंगणवाड्यांचा आस्‍थापना खर्च शासनानेच करावा, परंतु जागा व इमारती न. पं.च्‍या ताब्‍यात दिल्‍यास त्‍या अधिक सक्षम करुन मुलांना दर्जेदार शिक्षण देता येईल असे नगराध्यक्ष म्‍हणाले. यावर बंडू हर्णे यांनी यापुर्वी या विषयावर चर्चा होऊन ठराव घेण्यात आला होता, त्‍यावर न.पं. प्रशासनाने काय कार्यवाही केली? असा सवाल केला. त्‍यावर नगराध्यक्षांनी शहरातील जि.प. शाळा व अंगणवाडीमधील मुले, शाळा इमारतींची सद्यस्‍थिती याबाबतचा सविस्‍तर अहवाल तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी पुढील सभेत याबाबतची माहिती देण्याची ग्वाही दिली.

महिला विकास भवन बांधणे मुद्यावरही गरमागरम चर्चा झाली. नगराध्यक्षांनी शहरात महिलांची संख्या मोठी असून त्‍यांना विविध उपक्रम राबवण्यासाठी शहरात सुसज्‍ज महिला विकास भवन उभारण्याची गरज व्‍यक्‍त केली. यावर मेघा गांगण आणि बंडु हर्णे यांनी महिला विकास भवन उभारण्यास विरोध नाही परंतु आधी न. पं.कडे जागा आहे का याचा विचार करा. मागील ६ महिन्‍यात झालेल्‍या ठरावांची पूर्तता कितपत झाली याचीही माहिती द्या, अशा सुचना केल्‍या.

शहरातील भाजी मार्केट प्रसाधनगृहाच्‍या पहिल्‍या मजल्‍यावर सदनिका बंद असून त्‍यामध्ये ५ ते ६ बेडचे छोटे लॉजिंग केल्‍यास बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना याचा लाभ होईल आणि न. पं.चे उत्‍पन्‍न वाढेल असे नगराध्यक्षांनी सांगितले. त्‍यावर चर्चा करुन तसा निर्णय घेण्यात आला. शहरातील मोकाट गुरांसाठी कोंडवाडा आणि भटक्‍या कुत्र्यांच्‍या शेल्‍टर होमसाठी गोपुरीने न.पं.ला २० गुंठे जागा देण्याचे मान्‍य केल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.

नळयोजना पाणीपट्टी दरवाढी बरोबरच पूर्वी बसवलेले मीटरच्‍या सर्व्हेच्‍या सूचना करण्यात आल्‍या. जेणेकरून पुढील काळात मीटरनुसार पाणीपट्टी आकारता येईल व याचा फायदा न.पं.ला आणि नळ धारकांना होईल, याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या संस्‍थेस सुरक्षेच्‍या नियमांचे पालन करून जागा देणे, विविध संस्थांना अनुदान, सायन्‍स पार्क आदी मुद्यांबाबतही चर्चा झाली. एमएच०७ पासिंग वाहनांना टोलमाफी दिल्‍याबद्दल पालकमंत्री नितेश राणे आणि पीएचडी पदवी संपादन केल्‍याबद्दल नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्‍या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

प्रयत्‍न करणे आपले काम आहे!

नगराध्यक्ष संदेश पारकर म्‍हणाले, महिला विकास भवनसाठी जुन्‍या प्रारुप विकास आराखड्यानुसार जागा देणे शक्‍य आहे का हे पाहा. लागणारा निधी केंद्र, राज्य शासनाकडून आणता येईल. नवनवीन योजना येत आहेत. क्रिडांगणासाठी आरक्षित २४८ गुंठे जमिनीची मोजणी झाली असून उर्वरित जमिनीच्‍या मोजणीसाठी तातडीने प्रस्‍ताव केला जाईल. शहराच्‍या सर्वांगिण विकासासाठी आपले प्रयत्‍न आहेत. सर्वच गोष्टी होतील, असे नाही परंतु प्रयत्‍न करणे आपले काम आहे. उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी ठराव घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुख्याधिकारी यांनी ठरावांवर टिपणी करावी, अशा सूचना केल्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news