Sindhudurg News| पाणी अडवा, पाणी जिरवा... आता पाणी जपून वापरा..!

जलसंवर्धनाला मिळाली लोकसहभागाची साथ; पाणी बचतीसाठीही हवी व्यापक जनजागृती
Sindhudurg News
जिल्ह्यातील नदीनाल्यांवर गेल्या महिनाभरात आठ हजारांहून अधिक वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.
Published on: 
Updated on: 

अजित सावंत

सिंधुदुर्ग : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पुढील काळात पाणी टंचाईची तीव्रता वाढू नये यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सिंधुदुर्गवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जलसंवर्धनाच्या मोहिमेला हातभार लावला. जिल्ह्यातील नदीनाल्यांवर गेल्या महिनाभरात आठ हजारांहून अधिक वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. नदीनाल्यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंधारे बांधण्यात आले ही निश्चितच लोकचळवळ म्हणावी लागेल. मात्र पाणी अडविणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच उपलब्ध पाणी जपून वापरणेही आवश्यक आहे. त्यामुळे पाणी अडविणे आणि पाणी जिरविण्याबरोबरच पाणी बचतीचा मंत्रही प्रत्येकाने आता जोपासायला हवा, ती सध्याच्या परिस्थितीत गरज बनली आहे. त्यामुळे जलसंधारणाला जशी लोकसहभागाची साथ मिळाली, तशीच पाणी बचतीबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

सध्याच्या दुष्काळसदृश पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ट्रिगर १ मध्ये समावेश करण्यात आला आहे. एरव्ही डिसेंबर, जानेवारी पर्यंत खळखळाहून वाहणाऱ्या नद्या ऑक्टोबरमध्येच काही अपवादात्मक सोडल्या तर कोरड्या पडत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात व्यापक प्रमाणात जलसंवर्धनाची मोहिम राबवणे आवश्यक होते आणि ती जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून व्यापक प्रमाणात राबवली. गावागावांत नदीनाल्यांवर छोटे छोटे वनराई कच्चे बंधारे झाले. जिल्ह्यात १० हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यापैकी ८ हजाराहून अधिक बंधारे बांधून पुर्णत्वास गेले आहेत. पुढील काही दिवसात १० हजाराचा टप्पा देखील पूर्णत्वास जाईल. सर्वसामान्य जनता, विविध समाजसेवी संस्था आणि सर्वच घटकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्यामुळे हे शक्य झाले. त्यामुळे नदीनाल्यातून वाहून जाणारे पाणी आता बऱ्यापैकी अडले आहे. सध्या अधून मधून पाऊस देखील पडत असल्याने पाण्याच्या पातळीतही तेवढीच वाढ होणार आहे.

एकीकडे पावसाचे पाणी आपण साठवत आहोत; परंतु नळ योजनांच्या माध्यमातून येणारे पाणी आपण जपून वापरतो आहोत का याचाही प्रत्येकाने विचार करायला हवा. नळ, पाईपलाईन आणि घरगुती टाक्यांमधून होणारी गळती वेळीच दुरूस्त करायला हवी. घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणी पाण्याच्या वापराबाबत शिस्त यायला हवी. गाड्या धुण्यासाठी पाण्याचा मर्यादीत वापर व्हायला हवा. पाण्याचा वापर गरजेपुरताच करण्याची सवय प्रत्येकाने लावून घ्यायला हवी. छतावरील पावसाचे पाणी साठवणे आणि भूजल पुनर्भरणासाठी रेनवॉटर हार्वेस्टींगचाही वापर व्हायला हवा. सार्वजनिक नळांमधून पाणी वाहून जात असल्यास संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून द्यायला हवे. उपलब्ध असलेल्या पाण्याचा प्रत्येकाने आवश्यक आणि मर्यादित स्वरूपात वापर करायला हवा. त्यासाठी ग्रामपंचायतीनी ग्रामसभांमधून पाणी बचतीचे महत्त्व पटवून द्यायला हवे. शाळा, महाविद्यालयात जलसाक्षरतेचेही कार्यक्रम आयोजित करायला हवेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नळ गळती रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवायला हवी.

पाणी बचतीच्या या छोट्या छोट्या सवयींमुळेदेखील जलसंवर्धनालादेखील मोठा हातभार लागणार आहेत. पावसाळ्यातील पाण्याचा योग्य साठा भूजलपूनर्भरण आणि जलस्त्रोतांचे संवर्धन याला प्राधान्य द्यायला हवे. विहिरी, तलाव, पाणवठे आणि स्थानिक जलस्रोत यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत आणि शहरातदेखील पाण्याचा वापर आणि पाळी गळती याबाबत नियमित आढावा घेण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या बंधाऱ्यांमुळे निश्चितपणे जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदतच होणार आहे. पाण्याचे महत्व केवळ टंचाई काळातच न वाटता नियमितपणे जलसंवर्धन आणि पाणी बचतीसाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने योगदान द्यायला हवे. बंधारे बांधण्याची जबाबदारी प्रशासन आणि समाजाची आहे, पण पाणी जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. पाणीटंचाईच्या काळात बचतीचे धडे गिरविण्यापेक्षा मुबलक पाणी उपलब्ध असतानाच काटकसरीची सवय लावणे हीच खऱ्या अर्थाने जलसाक्षरता असणार आहे.

पाणी बचतीसाठी ‘हे’ करायला हवे

गरज नसताना नळ सुरू ठेवू नका, गळणारे नळ आणि पाईपलाईन त्वरित दुरुस्त करा, वाहने धुण्यासाठी पाईप ऐवजी बादलीचा वापर करा, घरातील पाण्याचा पुनर्वापर शक्य तिथे करा, पावसाचे पाणी साठवा आणि जमिनीन मुरवा, पाणी वाया जात असल्याचे दिसल्यास संबंधित यंत्रणेला कळवा, मुलांमध्ये लहानपणापासूनच पाणी बचतीची सवय रूजवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news