

विटा : २० वर्षे जुनी गळकी पाणी योजना आणि प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे विटा-कार्वे एमआयडीसीत पाणीबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
मंदीच्या सावटाखाली आधीच होरपळणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विटा-कार्वे विकास केंद्रातील उद्योगांना आता तीव्र पाणीटंचाईचा मोठा फटका बसला आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून पाईपलाईन गळती आणि त्यानंतर लागलीच लागू झालेली उपसाबंदी यामुळे येथील उद्योग अक्षरशः बंद पडण्याच्या मार्गावर आले आहेत. विटा-कार्वे एमआयडीसीच्या औद्योगिक पाण्याची गरज भागवण्यासाठी २००६ मध्ये पलूस येथील यशवंत सहकारी पाणी पुरवठा योजनेतून पाईपलाईनद्वारे पुरवठा सुरू केला होता. मुळात ही योजना शेतीसाठी असून तिला २० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यामु दोन-तीन वर्षांपासून जुन्या पाईप वारंवार फुटतात.
गेल्या १०-१२ दिवसांपूर्वी पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. मंदीच्या काळात महागडे टँकरचे पाणी विकत घेऊन उद्योग चालवणे उद्योजकांसाठी प्रचंड तोट्याचे ठरत आहे. त्यातच पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण झाल्यावर लगेचच शासकीय आदेशाने पाणी उपसाबंदी लागू झाल्याने पुन्हा पुरवठा खंडित झाला आहे. या दुहेरी संकटामुळे वर्षभर उद्योग कसे चालवायचे, असा गंभीर प्रश्न आहे.
दुसरीकडे, एमआयडीसी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराचाही उद्योजकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एखाद्या उद्योजकाचे पाणी मीटर बंद पडल्यास ते तत्काळ बदलून दिले तरी, गेल्या काही महिन्यांच्या वापराचे सरासरी बिल सक्तीने उकळले जाते. मात्र, १५-१५ दिवस पाणी बंद राहिल्याने होणाऱ्या कोट्यवधींच्या नुकसानीची कोणतीही दखल एमआयडीसी प्रशासन घेत नाही. दरम्यान, या गंभीर स्थितीची दखल घेऊन एमआयडीसीने २० वर्षे जुन्या योजनेचे त्वरित नूतनीकरण करावे आणि कार्वे औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर करून भविष्यातील वाढत्या औद्योगिक गरजांचे नियोजन करावे, अशी मागणी न्यू इंडिया टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष किरण तारळेकर यांच्यासह स्थानिक उद्योजकांनी केली आहे.