Sindhudurg News| पेंडूर रस्त्यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको!

मांड जत्रोत्सवापूर्वी ५ किलोमीटर रस्ता पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन
Sindhudurg News
पेंडूर रस्त्यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको!
Published on: 
Updated on: 

मालवण : तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेले डांबरीकरण यामुळे संतप्त झालेल्या पेंडूर ग्रामस्थांनी सोमवारी रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारला. आगामी मांड जत्रोत्सवापूर्वी कट्टा-पेंडूर-पराड-काळसे-हुबळीचा माळ हा रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनाची दखल घेत सा. बां. विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.

पेंडूर गावातील १४ दिवस चालणारा मांड जत्रोत्सव येत्या जानेवारी महिन्यात होणार आहे. या जत्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक गावात येणार असल्याने त्यापूर्वी संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार व टिकाऊ काम पूर्ण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी सुमारे १०० ते १२० ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभागी होत प्रशासनाचे लक्ष वेधले.

कट्टा-पेंडूर-पराड-काळसे-हुबळीचा माळ रस्त्याची गेल्या तीन वर्षांत दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि रस्त्याची झालेली दुर्दशा यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. रस्त्याचे बांधकाम होऊन अवघी तीन वर्षे झाली असताना त्याची झालेली दुरवस्था अनेक प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष दर्जेदार काम हवे, अशी ठाम भूमिका घेत संपूर्ण रस्त्याचे नव्याने टिकाऊ बांधकाम तातडीने करण्याची मागणी सा. बां. च्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

आंदोलनाची दखल घेत सा. बां. चे कार्यकारी अभियंता अजित पाटील आणि सहा.अभियंता सूरज गिरी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. जि. प. वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर यांनीही आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांच्या मागण्यांची माहिती घेतली. कार्यकारी अभियंता अजित पाटील यांनी पाच किलोमीटर रस्त्याचे काम मांड जत्रोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे मान्य केले. तसेच उर्वरित रस्त्याचा नव्याने आराखडा तयार करून मार्च २०२७ पर्यंत संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.