

Vengurla leopard attack calf killed
वेंगुर्ला : तालुक्यातील दाभोली कोऱ्याचीवाडी येथील शेतकरी यशवंत (प्रवीण) प्रकाश बांदवलकर यांच्या बागेत चारावयास सोडलेल्या दोन म्हैशीच्या दोन रेडकांवर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला. यात त्यांचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेवरून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी (दि. ४) सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हा हल्ला केला. याबाबत माहिती मिळाल्यावर वेंगुर्ला वनपाल सावळा कांबळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
यावेळी प्रवीण बांदवलकर, उमेश जोशी, संतोष पेडणेकर, विवेक जोशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान गेल्या वर्षभरात या परिसरात बहुसंख्य शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. तालुक्यातील मठ, सतयेवाडी, खानोली, दाभोली आदी भागात एका बिबट्याचा वावर असून शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वनविभाग मार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बेताची असून शासनाने लवकरात लवकर नुकसाभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.