

देवगड : भविष्यातील पाणीटंचाई व दुष्काळाच्या संभाव्य संकटावर मात करण्यासोबतच पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जपण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळ, खालचीवाडी यांच्या सहभागातून कुणकेश्वर येथील गंगेचा वहाळ येथे वनराई बंधारे बांधण्यात आले. या उपक्रमातून जलसंधारणाचा संदेश देतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, ग्रामपंचायत कुणकेश्वरचे माजी सरपंच महेश ताम्हणकर, श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, कृषी सहायक श्री. सोनार, जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश चव्हाण, सचिव विनय परब यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश चव्हाण यांनी सांगितले की, भविष्यात पाणीटंचाई व दुष्काळासारख्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच जलसंधारणाची कामे करणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे आणि त्याचा योग्य उपयोग करणे हेच या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला.
जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळाच्या माध्यमातून केवळ जलसंधारणाचे कामच नव्हे, तर रक्तदान शिबिर, शालेय स्पर्धा यांसारखे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमही राबविले जातात. या उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत मंडळाच्या सामाजिक योगदानाबद्दल अभिनंदन केले व आभार व्यक्त केले.