

वैभववाडी: आगामी गणेशोत्सव पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. उत्सव काळात नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक विभागाने घ्यावी, अशा सक्त सूचना तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी दिल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि आनंदात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सव पार्श्वभूमीवर वैभववाडी तहसील कार्यालयात आयोजित शांतता समिती बैठकीत तहसीलदार पाटील बोलत होते. नायब तहसीलदार निकम, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सहा. गटविकास अधिकारी श्रीमती माने, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पोटे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, जितेंद्र कोलते, रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन तळेकर तसेच नगरपंचायतीचे श्री पवार आदी उपस्थित होते.
बैठकीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी चार पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. वैभववाडी रेल्वे स्थानक, चेकपोस्ट, वैभववाडी बसस्थानक तसेच भुईबावडा येथे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वैभववाडी शहरात होणारी नागरिकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अ. रा. विद्यालय, महाकाली कॉम्प्लेक्स, तावडे बिल्डिंग आणि जिल्हा परिषद विश्रामगृह परिसरात वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत नगरपंचायतीकडून लवकरच आवश्यक नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वैभववाडी शहरातील रिक्षा स्टँड तसेच रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा भाडेदराचे फलक लावण्याच्या सूचनाही तहसीलदार पाटील यांनी दिल्या. जादा भाडे आकारल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारितील सर्व रस्ते गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात यापूर्वीही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.