

वैभववाडी : वैभववाडी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता तसेच स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याने संपूर्ण परिसराचे रूपडे पालटले आहे. चकाचक झालेल्या रस्त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून नागरिकांकडून या कामाचे स्वागत करण्यात येत आहे.
वैभववाडी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सुमारे ५०० मीटर लांबीच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रेल्वे स्थानक परिसरातील खराब झालेला मार्ग यामुळे प्रवासी तसेच वाहनचालकांना रोजच त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असल्याने रस्ता व स्थानक परिसराची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून सातत्याने केली जात होती.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रवासी आणि वाहनचालकांच्या अडचणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याची तातडीने दखल घेत पालकमंत्री राणे यांनी संबंधित यंत्रणेला रस्ता व रेल्वे स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आणि अल्पावधीतच ते पूर्ण करण्यात आले.
काँक्रिटीकरणामुळे आता रस्ता सुस्थितीत आला असून स्थानक परिसरही स्वच्छ, सुबक आणि सुरक्षित बनला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून नागरिक व वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही समस्या मार्गी लावल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे नागरिकांकडून आभार मानले जात आहेत. याबाबत दैनिक पुढारीने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्षवेधले होते. त्याची दाखल घेण्यात आली आहे.